Vasant More : मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजेच 'शिवतीर्थ' येथे भेट घेतली. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. राज ठाकरे यांच्या भाषणामुळे आपली अडचण झाली असं वक्तव्य वसंत मोरे यांनी केलं होतं. यानंतर मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांच्याऐवजी साईनाथ बाबर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली.


महत्त्वाचं म्हणजे नाराज वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र त्यांना तातडीने कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर रविवारी (10 एप्रिल) राज ठाकरे यांनी प्रतिसाद दिल्यानंतर भेटीची वेळ निश्चित झाल्यानंतर आज ही भेट झाली. भेटीनंतर आपण 100 टक्के समाधानी असल्याची प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे. वसंत मोरे यांनी राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत पक्षातच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यांनी सांगितलं की, आपल्या सर्व शंका दूर झाल्या आहेत. आपण पक्षातच राहणार आहोत. 


पुणे शहराध्यक्षपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर वसंत मोरे इतर पक्षात जाणार अशी चर्चा रंगली होती. शिवाय वसंत मोरे यांनीही आपल्याला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपकडून ऑफर असल्याचा दावा केला होता. परंतु मनसे सोडून जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर आज वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. 


पुण्यातील नाराजीनाट्यानंतर राज ठाकरे यांनी शहरातील प्रमुख नेत्यांना मुंबईत बोलावलं होतं. परंतु यात वसंत मोरेंना त्यावेळी निमंत्रण नव्हतं. यानंतर पुणे मनसे शहराध्यक्षपदावरुन त्यांची हकालपट्टी करत साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली. या सगळ्या घडामोडींनंतर वसंत मोरे यांनी गुरुवारी (7 एप्रिल) राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. परंतु राज ठाकरे यांनी सुरुवातीला त्यांना कोणताही प्रतिसाद दिलेला नव्हता. त्यानंतर  रविवारी राज ठाकरे यांनी वसंत मोरेंना भेटी वेळ दिल्यानंतर आज ही भेट झाली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha