Vasant More : पुणे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केलेले मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजेच 'शिवतीर्थ' येथे वसंत मोरेंनी भेट घेतली. या भेटीनंतर वसंत मोरे यांनी एक ट्वीट केले आहे. 'मी माझ्या साहेबांसोबत...आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही...!' असे ट्वीट वसंत मोरे यांनी केले आहे. सध्या त्यांच्या या ट्वीटची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 


वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केल्यानंतर ते अन्य कोणत्या पक्षात जाणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, भेटीनंतर वसंत मोरेंनी मी माझ्या साहेबांसोबत असे ट्वीट केले आहे. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही, असे ट्वीट वसंत मोरेंनी केले आहे. त्यामुळं सध्या तरी वसंत मोरे दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार नसल्याचे दिसत आहे. कारण त्यांनी राज ठाकरेंसोबत राहणार असल्याचे सांगितले आहे. तसेच या ट्वीटबरोबर त्यांनी पुण्याचे मनसेचे नवीन शहराध्यक्ष आणि मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याबरोबरचा फोटोही शेअर केला आहे.




 


राज ठाकरे यांचे भेटीनंतर वसंत मोरे नेमकं काय म्हणाले?


मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजेच 'शिवतीर्थ' येथे भेट घेतली. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. राज ठाकरे यांच्या भाषणामुळे आपली अडचण झाली असं वक्तव्य वसंत मोरे यांनी केलं होतं. यानंतर मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांच्याऐवजी साईनाथ बाबर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे नाराज वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र त्यांना तातडीने कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर रविवारी (10 एप्रिल) राज ठाकरे यांनी प्रतिसाद दिल्यानंतर भेटीची वेळ निश्चित झाल्यानंतर आज ही भेट झाली. भेटीनंतर आपण 100 टक्के समाधानी असल्याची प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे. वसंत मोरे यांनी राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत पक्षातच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यांनी सांगितलं की, आपल्या सर्व शंका दूर झाल्या आहेत. आपण पक्षातच राहणार आहोत असे त्यांनी सांगितले.