Ashadhi Wari 2023 : आषाढी वारीसाठी सध्या देहू आणि आळंदीत जोरदार तयारी सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघाताने नागरिकांचे बळी गेले. त्यामुळे राजकारण चांगलंच पेटलं होतं. वारीच्या काळातदेखील उन्हाचा तडाखा असल्याने कोणत्याही वारकऱ्याला उन्हाचा किंवा कोणताही वातावरणाचा त्रास होऊ नये आणि वारकऱ्यांचा नाहक बळी जाऊ नये, यासाठी आळंदीत आणि देहूत आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात औषधांची सुविधा करण्यात आली आहे. आपत्कालीन 108 सेवेच्या आणि 102 सेवेच्या अधिक रुग्णवाहिका नियुक्त करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनीदेखील वारीच्या तयारीसंदर्भात अनेक सूचना दिल्या आहेत. त्यासोबतच वारीच्या काळात कोणत्याही वारकऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. 


मंत्री  डॉ. सावंत यांनी दिलेल्या सुचना :


• आषाढी वारीनिमीत्त कृती आराखडा तयार करताना महाराष्ट्रातील सर्व दिंडीमार्ग विचारात घेण्यात यावेत.
• प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांची अंदाजे संख्या नियोजन करताना विचारात घ्यावी.
• दिंडी मार्गावर ठराविक अंतरावर पाच-दहा खाटांचे तात्पुरते दवाखाने कार्यान्वित करावे.
• दिंडी मार्गातील सर्व आरोग्य संस्था मनुष्यबळ आणि औषधीसह सुसज्ज ठेवण्यात यावी.
• दिंडीमध्ये वाढत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या  संख्येनुसार आरोग्य सुविधा वाढविल्या जाव्यात. 
• आरोग्य व्यवस्थेतील सर्व जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी यांची नावे ठळकपणे प्रर्दशित केली जावी.
• सर्व रुग्णवाहिकांची तपासणी करुन औषधी आणि इतर उपकरणे असल्याची खात्री करावी.
• उष्माघात व इतर आजारांच्या बाबतीत आवश्यक दक्षता घेण्यात यावी.
• नियोजन करतांना दिंडीमार्गाचे लहान गटांमध्ये विभाजन करुन जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणुक करावी. प्रत्येक गटात संपर्क यंत्रणा प्रभावीपणे राबवण्यात यावी.
• आवश्यक मनुष्यबळ राज्यातील इतर जिल्ह्यातून मागविण्यात यावे.
• आरोग्य विषयक सर्व कार्यक्रमांची माहिती दिंडी मार्गावरील प्रमुख गावामध्ये द्यावी.
• आषाढी पूर्वी दर आठवड्याला पूर्व तयारीचा आढावा घेण्यात यावा.
• दिंडी मार्गातील सर्व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र पातळीवर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कामाचे वेळापत्रक तयार करावे.
• सर्व दिंडी मार्गावर कलापथक/समुपदेशक यांचा माध्यमातून आरोग्य विषयक प्रबोधन करण्यात यावे.
• दिंडी मार्गावरील सर्व जिल्ह्यात आणि आरोग्य संस्थात औषध आणि आवश्यक साहित्य सामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावी.

संबंधित बातमी-


Sant Nivruttinath Palkhi : सिन्नरच्या कुंदेवाडीत दिवाळी, वारकऱ्यांसाठी 250 लीटर गुळवणी, 5 हजार पुरणपोळ्यांचे जेवण