पुणे : पुण्यात बांगलादेशी नागरिकांच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचं दिसून येत आहे. आठवड्याभरात पुन्हा एकदा 11 बांगलादेशी (Bangladesh)  नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स शाखेसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत, पुणे शहर पोलिसांनी भारतात बेकायदेशीर वास्तव्य आणि आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे बनवण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवल्याप्रकरणी काही मुलांसह 11 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.  याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी भारतात राहण्यासाठी बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड  कागदपत्रे बनवली होती. ते शहरातील उरुळी देवाची परिसरात राहत होते. आरोपींकडे भारतात राहण्यासाठी कोणताही वैध पासपोर्ट आणि व्हिसा नसल्याचे तपासात उघड झाले आहे.



निजाम रहीम अली शेखे, बाबू मोहसीन मंडल, कमरूल रोशन मंडल, सगल आलम शेख, मजमा बाबू मंडल, मरियम कमरूल मंडल, आलम शेख आणि शाहनून आलम शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याशिवाय पोलिसांनी या प्रकरणी 8 वर्षे, 6 वर्षे आणि 3 वर्षे वयाच्या तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 420, 465, 467, 468 आणि 470 आणि पासपोर्ट कायद्याच्या कलम 3 आणि परदेशी कायद्याच्या इतर संबंधित कलमांखाली गुन्हा. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.


पुण्यात एवढ्या संख्येत बांगलादेशी कसे?


मागील काही दिवसांपासून पुण्यात बांगलादेशी नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक परिसरात अनेक बांगलादेशी नागरिक राहत असल्याचं समोर आलं होतं. त्यातच आता पुणे पोलीस बांगलादेशी नागरिकांबाबतीत अॅक्टिव्ह मोडवर आल्याचं बघायला मिळालं आहे. बांग्लादेशी महिना आणि पुरुषांवर पोलिसांनी करडी  नजर ठेवल्याचं दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. विशेष मोहिमेंतर्गत 19 बांगलादेशींना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते. यात 10 महिला आणि 9 पुरुषांचा समावेश होता.


पुण्यातील बुधवार पेठ परिसरात हे बांगलादेशी लोक राहत होते. यातील 10 महिला बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करत होत्या तर पुरुष वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते.  बुधवार पेठेतील सागर नावाच्या इमारतीतून या 19 जणांना ताब्यात घेतलं होतं. या 19 जणांकडे कोणतीही वैध कागदपत्रे नाहीत. तसेच भारत बांगलादेशी सीमेवरुन अनधिकृत भारतात प्रवेश केल्याचं देखील समोर आलं होतं.


इतर महत्वाची बातमी-


Manipur Violence : मणिपूर हत्याकांड प्रकरण: सीबीआयने पुण्यातून मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या