पुणे : पुण्यातील आलिशान रुफटॉप हॉटेल्स(Roof top hotel) आता चांगलीच डोकेदुखी बनत चालली आहे. अनेकांनी या हॉटेल्सच्या आवाजामुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी दिल्या आहे. त्यामुळे आता महापालिकेने या हॉटेल्सवर कारवाई करायला सुरुवात करण्यात आली आहे. मागील चार दिवसांत पुण्यातील 9 रुफ टॉप हॉटेल्सवर महापालिकेने कारवाई केली आहे.
शहरात वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड, निगडी, स्पाईन रोड, भोसरी, आकुर्डी या भागांत मोठ्या संख्येने रुफटॉप हॉटेल आहेत. इमारतीच्या गच्चीवर हे हॉटेल चालविले जातात. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने काही महिन्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात शहरात 48 रुफटॉप हॉटेल आढळले होते. अग्निशमन विभागाने या हॉटेलमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने त्यांना नोटीस बजावली. त्यानंतर काही हॉटेल बंद करण्यात आली. मात्र, काही हॉटेलमालकांनी नोटीसला उत्तर दिले नाही. त्यामुळे महापालिकेने आता प्रत्यक्ष अशा हॉटेलवर कारवाई सुरू केली आहे.
धडाधड कारवाया...
एका वर्षात एकूण 29 रूफटॉप हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. शहर पोलीस आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीही पुण्यातील रुफटॉप हॉटेल्सविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेने गेल्या काही महिन्यांत शहरातील अनेक रूफटॉप हॉटेलचे बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. महंमदवाडी, कल्याणीनगर, येरवडा, कोरेगाव पार्क, बाणेर, पाषाण, कोथरूड, खराडी आणि शहरातील इतर भागात असलेल्या प्रसिद्ध रूफटॉप पब आणि बारला यापूर्वी नोटीसा बजावल्या होत्या आणि त्यांच्यावर कारवाईदेखील करण्यात आली होती.
तरुणांचा आवाज आणि राडा
पुण्यातील अनेक परिसरात रुफ टॉप हॉटेल्स आणि बार आहेत. हे बार रात्री उशीरापर्यंत सुरु असतात. अनेक तरुण मंडळीचं सध्या आवडीचं ठिकाण म्हणजे अनेक रुफ टॉप हॉटेल्स आणि बार झाले आहेत. तरुणांचा आवाज आणि राडा रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याने गाण्याच्या आवाजाबाबत अनेकदा स्थानिकांनी तक्रारी दिल्या होत्या. यावेळी पोलिसांवर देखील नागरीक मंचाने आरोप केले होते.
तरुणांचं आवडतं ठिकाण बनतंय धोक्याचं
सध्या रुफटॉप हॉटेल्स महापालिकेच्या रडारवर आहे. त्यातील फक्त काहीच हॉटेल्सकडे योग्य ते परवाने असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात शेकडोच्या संख्येने रुफ टॉप हॉटेल्स आहेत. त्यातील काहीच ह़ॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. बाकी हॉटेल्स सर्रास सुरु असल्याचं चित्र आहे. मात्र त्या हॉटेल्सवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच काही महिन्यांपूर्वी अनधिकृत बांधलेल्या लुल्ला नगर परिसरातील हॉटेलला आग लागली होती. त्यावेळी अनेक ग्राहकांच्या जीवालादेखील धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
इतर महत्वाची बातमी-