लोणावळा (पुणे) : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची पायीदिंडी पुण्यात (Pune) धडकी भरवल्यानंतर आता मुंबईच्या (Mumbai) दिशेनं सज्ज झाली आहे. पुण्यातील अभूतपूर्व स्वागतानंतर लोणावळ्यात आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा पोहोचला. मनोज जरांगे यांनी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धार केला आहे. तसेच समाजाशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आजपासून मुंबईकडे पायीदिंडीने मनोज जरांगे प्रस्थान करणार आहेत. यासाठी नवी मुंबईत सुद्धा जंगी तयारी करण्यात आली आहे. 


कसं असेल नवी मुंबईतील नियोजन? 



  • पनवेलवरून उलवे मार्गे नवी मुंबईत पाम बीच मार्गावर प्रवेश असेल 

  • पाम बीच मार्गावरून नेरूळ करत वाशीमध्ये आंदोलक येणार 

  • पाम बीच रस्त्यावर पुरूष मराठा आंदोलन आणि त्यांच्या गाड्या थांबतील. 

  • रात्री मनोज जरांगे पाटील कांदा बटाटा मार्केट मध्ये राहणार 

  • सकाळी 26 जानेवारी निमित्त झेंडा वंदन करून निघणर 

  • वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेवून मुंबईच्या दिशेने निघणार.. 

  • महिला वर्ग एपीएमसीमध्ये राहणार.. 

  • जेवणाची , राहण्याची सोय तसेच मोबाईल टॅायलेट आणि आंघोळीसाठी टँकर उपलब्ध

  • आज नवी मुंबईत मराठा बांधवांचा मुक्काम असल्याने मोबाईल टॅायलेटची मोठी सोय 

  • एपीएमसी परिसरात हजारोच्या संख्येने मोबाईल टॅायलेटची व्यवस्था 

  • आंदोलक महिला वर्ग एपीएमसी मध्ये थांबणार असल्याने त्यांची गैरसोय होवू नये यासाठी टॅायलेटची उभारणी 

  • एपीएमसी प्रशासन, नवी मुंबई महानगरपालिकेकडून सोय उपलब्ध


दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीतून सुरु केलेली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीची पायी दिंडीचे पुण्यात अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. बुधवारी सकाळी वाघोली परिसरातून सकाळी नऊ वाजता सुरू झाली. चंदननगर, येरवडा, शिवाजीनगर, औंध असा प्रवास करत जरांगेंचा मोर्चा आज पहाटे (25 जानेवारी) रात्री पावणेचारच्या सुमारास डांगे चौकात पोहोचला. पुढे बिर्ला हाँस्पीटल, चाफेकर चौक, भक्ती शक्ती चौक असा प्रवास झाला. जागोजागी चौकाचौकात समर्थक जंगी स्वागतासाठी हजर असताना यातून मार्ग काढत जरांगेंना पोहोचण्यास उशीर होत आहे. रात्रीच्या कडाक्याच्या थंडीतही लहान मुलं, तरुण, वयोवृद्ध सर्व वयोगटातील लोक जरांगेंच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर उभे आहेत.


थंडी वाढली, जागोजागी शेकोटी पेटवली 


मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मराठा बांधव, लहान मुलं, महिला रस्त्याच्या दुतर्फा उभी होती. मराठा बांधव माझ्यासाठी गेले अनेक तास रस्त्यावर थांबले आहेत, यांना भेटल्याशिवाय मी जाऊ शकत नाही, ही लोकच माझी ताकद असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मोजता येणार नाहीत अशा पद्धतीने मराठा बांधव या मोर्चात सहभागी होत आहेत. ते म्हणाले की, 26 तारखेला आम्ही मुंबई पोहोचणार आहे. जोपर्यंत आमच्या बातम्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. न्यायालयात जाण्याचा अधिकार आम्हालाही आहे, आमचे वकील आमची बाजू मांडतील. कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेलं नाही. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे ते म्हणाले. 


पिंपरी चिंचवडमध्ये पहाटे साडेचार वाजता मराठा बांधवांनी जेसीबी लावून मनोज पाटील यांच्यावर फुल उधळली. तसेच  फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. यामध्ये महिलांचाही सहभाग मोठा होता. 


इतर महत्वाच्या बातम्या