पुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरु असलेल्या आंतरवाली सराटीमधील (Antarwali Sarathi) उपोषणास्थळी 1 सप्टेंबरच्या रात्री पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. दरम्यान, यावेळी त्या रात्री नेमकं काय घडलं यावरून वेगवेगळी मतं मांडण्यात आली होती. मात्र, 1 सप्टेंबरच्या रात्री आंतरवाली सराटीमध्ये नेमकं काय घडलं याचा खुलासा मनोज जरांगे (Manoj Jarange)  यांनी केला आहे. पुण्यात (Pune) पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी याबाबत A टू Z माहिती दिली आहे. 


यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, "लाठीचार्ज होण्याच्या आदल्या दिवशी रात्री 500 ते 600 पोलीस आले होते. त्यांच्याकडून उपचार घेण्याचा आग्रह करण्यात आला. उपोषण करताना मी कधीही उपचार घेत नाही. पाणी पीत नाही आणि जेवायचं तर विषयच नाही. माझं कठोर उपोषण असतो. पोलीस आल्याने मोठा जमाव जमला होता. पण त्यावेळी आंतरवाली सराटीमधील जमाव शांत केल्याने पोलीस अधीक्षक यांनी पाठ थोपाटली. मात्र, त्यानंतर ते दोन दिवसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस घेऊन पुन्हा आले. पुन्हा उपचार घेण्याचा आग्रह केला. त्यांच्या म्हणण्यानुसार उपचार घेतला, त्यामुळे पोलीस देखील निघून गेले. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलीस गावात आले. त्यावेळी एवढे पोलीस आले की, मोजणं देखील अवघड होतं. त्यांच्या गाड्यांमध्ये सोली होत्या, दहा पेक्षा अधिक गाड्यांमध्ये फक्त लाठ्या होत्या, काही गाड्यांमध्ये हेल्मेट, सर्व वेगवेगळे प्रयोग होते. सोबत अश्रुधाराच्या नळकांड्या देखील आणल्या होत्या. 


 पोलिसांनी वरून अचानक सुरू केलं...


आंदोलनास्थळी आल्यावर त्यातील 200 ते 300 पोलीस थेट आमच्या आंदोलनात घुसले. काही पोलीस साध्या कपड्यांमध्ये होते. आमच्या लोकांना कळत होतं काय घडत आहे. त्यातील काही पोलिसांनी माईकचे वायर तोडले. त्यामुळे आमचा आवाज बंद झाला. त्यांच्यातील काही लोकांनी एक-दोन चापटा देखील मारल्या. काही पोलिसांनी कोपऱ्या मारल्या. त्यांच्यातील काही जण म्हणत होते असे करू नका. अशात आमचे काही दोन-तीन मुलं खाली पडले. त्यानंतर पोलिसांनी वरून अचानक सुरू केलं. त्यानंतर परिस्थिती एवढ्या विकोपाला गेली की, आता तो क्षण आठवला तरी वाईट वाटते, असं जरांगे म्हणाले. 


आमच्या मुंडक्यावर पाय दिले 


पोलिसांनी यावेळी आमच्या आई-बहिणींची डोके फोडली. तो विषय काढला की, ज्यांनी ही परिस्थिती पाहिली त्यांनाच माहीत आहे की काय परिस्थिती होती. आमच्या मुंडक्यावर पाय देण्यात आले. गोळ्या मारण्यात आल्या. कधी घर सोडून कुठेही न जाणाऱ्या महिलांची डोकी फोडली. काहींची नाकं आणि कुणाची कान तोडली. डोक्याला 34 टाके पडले. आमरण उपोषण एवढं शांत कोणतंही आंदोलन असू शकत नाही, त्यामुळे महिला त्या ठिकाणी आल्या होत्या. आदल्या दिवशी दोन ते अडीच लाख लोकांचा जमाव होता.  माझ्या एका शब्दावर हा जमाव निघून गेला. जर आम्हाला काही करायचं असतं, तर त्याच दिवशी केलं असतं, असेही जरांगे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


लाख-कोटीमधील फरक कळेना अन् मंडल आयोग संपवण्याची भाषा करतात; भुजबळांची जरांगेंवर टीका