मुंबई : ओबीसी आरक्षण (OBC Reservation)  रद्द करण्यासाठी न्यायालयात जाण्याचा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) प्रत्युत्तर दिले आहे. जरांगे यांच्यात हिंमत असेल तर मंडल आयोगाविरोधात कारवाई करावी आणि आवाज उठवावा, माझं त्यांना थेट आव्हान असल्याचे भुजबळ म्हणाले आहेत. ज्यांना लाख आणि कोटीमधील फरक कळत नाही ते आता मंडळ आयोगाला संपवण्याची भाषा करतायत असेही भुजबळ म्हणाले. 


मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याने आम्हाला देखील ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करावी लागणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. जरांगे यांच्या याच इशाऱ्यानंतर भुजबळ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. "जरांगे मंडळ आयोगाला आव्हान देणार म्हणतात, त्यांनी आव्हान द्यायलाच पाहिजे. त्यांच्या एवढा न्यानी हिंदुस्तानमध्ये कोणी आहे का?, कारण ते ताकदवर खूप आहेत. तीन कोटी मराठा मुंबईत आणणार होते. वाशीमधील ते कोटी सर्वांनी बघितले. ज्याला लाख आणि कोटीमधील फरक समजत नाही अशी माणसं मंडळ आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहेत. त्यांनी ते आवश्यक करावं, त्यांची हिंमत असेल तर त्यांनी मंडळ आयोगाला विरोधात आवाज द्यावा, तसेच मंडळ आयोगावर कारवाई करावी. हिंमत असल्यास मंडळ आयोगाला संपवण्याचं त्यांनी काम करून दाखवावं, त्यांना माझं चॅलेंज असल्याचे भुजबळ म्हणाले. 


भुजबळांचा सरकारला टोला


दरम्यान पुढे बोलतांना भुजबळ म्हणाले की, झूंडशाहीच्या पुढे नमते घेतले जात आहेत. ते मराठा जातीसाठी लढत आहेत. मी तर संपूर्ण समाजासाठी लढतोय. मी सगळ्या ओबीसींसाठी लढतोय. त्यांनी सांगितल्यावर सगळे मंत्री, सचिव तयार होतील ताबडतोब जातील. जीआर सुद्धा काढतील असे म्हणत भुजबळांनी सरकारला देखील टोला लगावला. मात्र, आम्ही आमच्या कार्यक्रमानुसार जात आहोत. आम्ही तो आखला आहे. माझा अजेंडा फक्त ओबीसी बचाव असल्याचे भुजबळ म्हणाले. 


गावागावात उन्माद उत्सव सुरू


गावागावात गेले तीन दिवस  झाला आहे. ओबीसींच्या घरासमोर फटाके लावायचे नाचायचे असे प्रकार सुरु आहे. आता आम्ही जिंकलो असे दाखवले जात आहे. लोकांना गाव सोडून देण्याची वेळ आली आहे. जो उन्मादी उत्सव ओबीसीच्या विरूद्ध सुरु आहे तो आम्ही पाहत आहोत. ही भयंकर परिस्थिती राज्यात निर्माण झाली असल्याचे देखील भुजबळ म्हणाले. 


भुजबळांना कुठेही आंदोलन करू द्या : मनोज जरांगे 


छगन भुजबळ यांनी कुठेही आंदोलन करू द्या, कोणी भूमिका बदललेली नाही, सर्व सुरळीत होईल असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा व्यक्त केलाय. रायगडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनानंतर परत निघालेल्या जरांगे पाटील यांनी पिंपरी चिंचवडजवळ मोशी इथे मुक्काम केला होता. त्यानंतर आज ते निघाले असता त्यांनी सर्व सुरळीत होईल आणि मराठ्यांना आरक्षण मिळेल असा दावा केला आहे. 



इतर महत्वाच्या बातम्या: 


...तर OBC आरक्षणच रद्द होऊ शकते, मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसींमध्ये खळबळ