Aaditya Thackeray : पुणे शहर हे नेहमीच नवनवीन बदलांसोबत राहिले असून नवीन क्रांतिकारी कल्पना, ज्ञान, वारसा, नाविन्यता, संस्कृती, चैतन्य ही येथील बलस्थाने आहेत. त्यामुळे पुण्यात भरवलेली पर्यायी इंधन परिषद शाश्वत विकासाच्यादृष्टीने महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे गाठण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. पुण्यात पार पडलेल्या ‘पुणे अर्ल्टरनेट फ्युअल कॉन्क्लेव्ह’ नंतर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये वातावरण पोषक शेती, शहरीकरण, शहरे आणि तेथील वातावरण आणि क्लीन एनर्जी या विषयांवर पर्यावरण, वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चर्चा सत्र आणि परिषदांचे आयोजन करणार  असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 




आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, या परिषदेबरोबरच भरवलेल्या प्रदर्शनामध्ये मोठ्या वाहन उद्योगांनी भाग घेतला; आणि अधिक उल्लेखनीय बाब म्हणजे ३० ते ४० वयोगटातील नवोद्योग (स्टार्टअप) स्थापन करुन वाटचाल करण्यास सुरू केलेल्या युवक-युवतींनीही भाग घेतला. इलेक्ट्रिक वाहने तसेच अन्य पर्यायी इंधन क्षेत्रात नाविन्यपूर्ण कल्पनांवर काम करू इच्छिणाऱ्या या युवकांना आपल्या पृथ्वीची जपणूक करण्यासाठी प्रोत्साहन, सहाय्य देणे आपले कर्तव्य आहे. त्यांनी सुरू केलेले स्टार्टअप पुढील जवळच्या काळात मोठे नाव कमावतील, असा विश्वासही व्यक्त केला.


राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून गेल्या दोन वर्षात पर्यावरणाच्या अनुषंगाने चांगली धेयधोरणे बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विभाग सध्या यामध्ये महत्वा ची भूमिका बजावत आहे. देशात प्रथमच महाराष्ट्राने राज्य वातावरण बदल परिषदेची स्थापना करुन त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. नागरी विकास, उद्योग, परिवहन, वने आदी क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी या परिषदेद्वारे बनवल्या जाणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांचा निश्चितच उपयोग होईल, असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले. कोणतेही वाहन खरेदी करताना कमीत कमी इंधनात जास्त अंतर कापणाऱ्या वाहनाला प्राधान्य देण्याची आपली मानसिकता असून इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीप्रसंगी यापुढे रेंजला अधिक महत्त्व दिले जाईल. वाहन उद्योगांना या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, असेही ठाकरे म्हणाले.