मुंबई : पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताप्रकरणी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस, जिल्हाधिकारी आणि रेल्वे प्रशासनाला प्रतिवादी करण्यात यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

बेकायदा होर्डिंगमुळे राज्यातील अनेक शहरे विद्रुप झाली असून त्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यातच पुण्यातील शनिवार वाड्याजवळील जुना बाजार परीसरात 5 ऑक्टोबर रोजी होर्डिंग कोसळून अपघात झाला. या दुर्घटनेत चार जण ठार तर आठ जण जखमी झाले.

हा अपघात महापालिका की रेल्वेच्या हद्दीत झाला? यावरुन सध्या वाद सुरु असून याप्रकरणी कनिज ए फातेमाह सुखरानीच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात पुणे महापालिका आयुक्त तसेच इतर अधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती महेश सोनक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने या दुर्घटनेप्रकरणी महापालिका आयुक्त, पुणे पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी आणि रेल्वे प्रशासनाला प्रतिवादी करण्याचे आदेश देत 24 ऑक्टोबरपर्यंत याबाबतची सुनावणी तहकूब केली.