पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे नेमके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे की एकनाथ शिंदे गटाचे आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात शिवसेनेत उभी फूट पडली असताना खासदार बारणे उद्घाटन कार्यक्रमाला हजर झाले. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे नेमके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटात की एकनाथ शिंदेच्या गटात राहणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.


खासदार बारणे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये नाहीत, सध्या ते पिंपरी चिंचवडमध्येच आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत आहेत असा निष्कर्ष काढला जात आहे. पण अशा बिकट परिस्थितीत खासदार बारणे यांनी एका उद्घाटनाला हजेरी लावली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. उदघाट्न कार्यक्रमाची बातमी प्रसारित करावी, यासाठी खासदार बारणे यांनी मेल द्वारे प्रेस नोटही पाठवली आहे. चिंचवड रेल्वे स्टेशनवर मोरया गोसावी आणि चाफेकर बंधूंच्या स्मारकाची माहिती देणार फलक लावण्यात आलं आहे. त्याचं अनावरण खासदार बारणेंच्या हस्ते आज झालं. तसेच चाफेकर बंधूंचे तैलचित्रही चिंचवड स्टेशनवर लावणार असल्याचं जाहीर केलं. 


20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडली. यात शिवसेनेच्या सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांचा विजय झाला. परंतु या विजयाचा आनंद साजरा करण्याची संधी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही मिळाली नाही. कारण विधानपरिषदेच्या निवडणूक निकालाच्या दिवशीच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. रात्रीतूनच ते समर्थक आमदारांसह सूरतमधील हॉटेलमध्ये दाखल झाले. आता शिवसेनेतून तब्बल 40 आमदार फूटल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदे सध्या गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये आहेत.


राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला असताना चर्चा, बैठका आणि गाठीभेटींचं सत्र सुरु झालं आहे. बंडखोरी केलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे उद्घाटन कार्यक्रमाला हजर राहिल्याने ते मुख्यमंत्र्यांच्या गटात राहणार की शिंदेंच्या गटात याची चर्चा सुरु झाली आहे.