Maharashtra Shiv Sena MLA Latest Updates : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. काही आमदारांना घेऊन शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र 40 हून अधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. शिंदे आणि इतर आमदारांनी केलेल्या बंडानंतर आता प्रश्न उपस्थित होत आहे तो सत्तांतर होणार का? याबाबत घटना तज्ञ उल्हास बापट यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला. त्यांनी या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.


बापट यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे यांनी गटनेता बदलला आहे ते कायदेशीर आहे. मात्र जर शिंदेंकडे 37 सदस्य असतील तर गटनेता कोण आहे याला फार महत्व उरत नाही. कारण ते अपात्र ठरणार नाही. प्रत्येकाचं पत्र वेगवेगळं सह्यांसकट राज्यपालांना द्यावं लागेल. हे पत्र त्यांनीच लिहिलं आहे का याची शहानिशा होते. किंवा राज्यपालांसमोर सर्व 37 लोकांना उभं केलं तरी प्रश्न सुटू शकतो, असंही उल्हास बापट यांनी सांगितलं. हॉस्पिटलमधूनही राज्यपालांना राज्यकारभार चालवू शकतात, असंही ते म्हणाले. 


अशी होऊ शकते प्रक्रिया


जर एकनाथ शिंदे यांचं हे बंड यशस्वी झालं तर सत्ताबदलाची वाट नेमकी कशी असेल याची उत्सुकता आहे. आज एकनाथ शिंदे येतील पत्र घेवून येतील. विधानसभा अध्यक्षांना ते भेटतील. अध्यक्ष नसल्याने उपाध्यक्ष यांच्याकडे ते गट स्थापन केल्याचे पत्र देतील. 2/3 मेजॉरिटी असेल तर विधानसभा अध्यक्ष त्या गटाला परवानगी देतील. त्यानंतर ते राज्यपाल कार्यालयात भेटतील आणि सरकारचा पाठिंबा काढला असं पत्र देतील. यानंतर राज्यपाल बहुमत सिद्ध करायला सांगतील. बहुमत नाही असं लक्षात आलं तर मुख्यमंत्री राजीनामा देतील अन्यथा ते बहुमताला सामोरे जातील. अशी साधारण प्रक्रिया होऊ शकते असा अंदाज आहे. 


एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता राज्यात सत्तापालट होणार का? याची चर्चा सुरु आहे. शिंदे यांच्या गटाकडून भाजपसोबत सत्ता स्थापन करावी असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला असल्याची माहिती आहे. सूरत आणि गुवाहाटीमध्ये या गटासोबत काही भाजप नेते दिसून देखील आले. 


शिंदेंसोबत नेमके आमदार किती?
 एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत 'शिवसेनेचे 40 आमदार माझ्यासोबत आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आणि त्यांची भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत.' असं म्हटलं. मात्र एकनाथ शिंदे यांनी सोबत 40 आमदार असं म्हणत असले तरी त्यात अपक्ष आणि इतरांना धरण्यात दोन तृतीअंशच्या नियमानुसार अर्थ नाही. शिवसेनेतील किती आमदार आहेत हे महत्वाचं असणार आहे.  कारण पुढची सारी गणिते, चित्र, शक्यता या त्यावरच अवलंबून आहेत. आकड्यांबाबत बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, शिवसेनेचे 33 आमदार आणि 3 अपक्ष असे एकूण 36 आमदार एकत्र आहेत.  तर हाच आकडा सांगताना शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी वेगळा सांगितला आहे. शिरसाट यांनी सांगितलं की,  आम्ही सर्वजण सोबत आहोत. शिवसेनेचे 35 आमदार आणि 5 अपक्ष असे एकूण 40 आमदार सोबत आहेत. दुपारपर्यंत 46 च्या पुढे जाईल. त्यात शिवसेनेचे 40 आमदार असतील, असाही दावा त्यांनी केला आहे.   


इतर महत्वाच्या बातम्या


शिंदेंसोबत शिवसेनेचे नेमके आमदार किती? शिंदे म्हणतात 40 तर कुणी म्हणतंय 33, कुणी म्हणतंय 35... 


महाराष्ट्रावर वार! एकनाथ शिंदेंच्या मानगुटीवर बसून भाजप 'ऑपरेशन कमळ' घडवतंय; सामनातून हल्लाबोल 


महाराष्ट्रातील राजकीय भूकंपामागे गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा मोठा हात; कोण आहेत CR पाटील?