पंढरपूर: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपला दणका दिला आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांना आता पंढरपूर शहरातूनही मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. भाजप परिचारक गटाचे तीन तर भालके गटाच्या सात नगरसेवकांनी आज खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
आम्ही शरद पवार यांच्या विचाराचे पाईक असून यापुढे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणार असल्याचा दावा या नगरसेवकांनी केला आहे. यामध्ये प्रताप गांगेकर हे माजी नगराध्यक्ष असून यामुळे अनिल सावंत यांची शहरातील ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या प्रवेशामुळे आता शरद पवार गटाने भाजप व काँग्रेस या दोघांनाही जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. या नगरसेवकांशिवाय अनेक दिग्गज जेष्ठ कार्यकर्त्यांनीही आज शरद पवार गटात प्रवेश केल्याने ऐन प्रचाराच्या काळात हा आमदार समाधान आवताडे व काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पंढरपूर शहरामध्ये या नगरसेवकांची मोठी ताकद असून आता पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे. या प्रवेशाचा फायदा अनिल सावंत यांना होणार असून खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे अनिल सावंत यांच्यासाठी ही जमवाजमव करू लागले आहेत.
अनिल सावंत यांची प्रतिक्रिया
आज दहा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शरद पवारांवरती विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला आहे. पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. आमचा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भक्कमपणे पुढे येतोय. भाजप परिचारक गटाचे तीन तर भालके गटाच्या सात नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनी दिली आहे.
पंढरपूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसकडूनही उमेदवार
पंढरपुरात भाजपचे समाधान आवताडे व काँग्रेसचे भगीरथ भालके यांच्यात थेट लढत होईल अशी चर्चा होती. मात्र, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे सध्या तिहेरी लढत होणार असल्याचं चित्र आहे.