NCP Ajit Pawar 2nd Candidate List: निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर प्रक्षप्रवेश होताना दिसत आहेत. आज (शुक्रवारी) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहेत. अनेक नेत्यांनी यावेळी अजित पवार गटात प्रवेश केला. काँग्रेस नेते आणि वांद्रे पूर्वचे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांनी देखील अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्याचबरोबर संजय काका पाटील, निशिकांत पाटील, सना मलिक यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्ष प्रवेश पार पडला. निशिकांत पाटील यांना सांगली इस्लामपूरमधून, संजय काका पाटील यांना तासगावमधून तर सना मलिक यांना चेंबूर अणूशक्ती नगर येथून उमदेवारी देण्यात आली आहे. तर नवाब मलिक यांचा पत्ता कट करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. तर आज पक्षप्रवेश पार पडल्यानंतर सना मलिक, माऊली कटके, झिशान सिद्धकी यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत.


आज पार पडलेले प्रवेश


1) संजय काका पाटील- तासगाव कवठे महाकाळ
2) देवेंद्र भुयार- वरुड मुर्शी 
3) निशिकांत पाटील- इस्लामपूर 
4) प्रतापराव चिखलीकर- लोहा कंधार
5) झिशान सिद्धकी- वांद्रे पूर्व
प्रवेश आधीच पार पडले आहेत
6) सना मलिक- एबी फॉर्म दिला
7) माऊली कटके- एबी फॉर्म दिला (शिरूर हवेली)


दुसऱ्या यादीत कोणाला उमेदवारी


तासगाव कवठे-महाकाळ : संजय काका पाटील 
अणुशक्तीनगर : सना मलिक 
इस्लामपूर : निशिकांत पाटील 
लोहा कंधार : प्रतापराव चिखलीकर 
वांद्रे पूर्व : झिशान सिद्धकी  
वडगाव शेरी : सुनिल टिंगरे
शिरुर : ज्ञानेश्वर कटके


नवाब मलिकांचं तिकिट कापलं?


राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर नवाब मलिक यांनी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. भाजपकडून त्यांना सोबत घेण्यासाठी विरोध केला तरी अजित पवारांनी मलिकांना सोबत ठेवलं. नवाब मलिक मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, तर त्यांची कन्या सना मलिक अणुशक्तीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत त्यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांना अबी फॉर्म देखील देण्यात आला आहे. नवाब मलिक हे अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, कारण महायुतीतील जागावाटपात अणुशक्तीनगर आणि मानखुर्द-शिवाजीनगर या दोन जागा अजित पवार गटाला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र उमेदवारी जाहीर न झाल्याने नवाब मलिकांचं तिकिट कापल्याच्या चर्चा आहेत. 


अजित पवारांची प्रतिक्रिया


नवाब मलिकांचं तिकिट कापल्याच्या चर्चा येत असतानाच आता अजित पवारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या नवाब मलिक यांच्या बाबत ज्या बातम्या सुरु आहेत त्या अत्यंत चुकीच्या आहेत. नवाब मलिक यांच्या बाबत अद्यापही चर्चा सुरू आहे. अशी माहिती अजित पवार यांची एबीपी माझाला दिली आहे.