Mayuresh Wanjale: पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून "सोनेरी आमदार" अशी ओळख असलेले स्वर्गीय आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर झाली. साधारण बारा वर्षानंतर वांजळे यांच्या कुटुंबात मनसेकडून ही उमेदवारी देण्यात आली आहे.
पुणे शहरातील मनसेच्या तीन उमेदवारांमध्ये मयुरेश वांजळे हे सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मयुरेश वांजळे (Mayuresh Wanjale) यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी मयुरेश वांजळे खूप भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच खडकवासला मतदारसंघातून निवडून येण्याचा विश्वास देखील मयुरेश वांजळे यांनी व्यक्त केला आहे. मला वडिलांची आठवण आल्यावर नेहमी रडू येतं. मात्र मी रडणारा नाही, लढणारा आहे. मी माझे अश्रू दाबून ठेवले आहेत. आता ज्या दिवशी मी जिंकणार त्याच दिवशी रडणार, असं मयुरेश वांजळेंनी सांगितले.
खडकवासला मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. त्यामध्ये महत्वाचा म्हणजे रोजगार. मला खडकवासलामध्ये लवकरात लवकर एमआयडीसी आणायची आहे, असं मयुरेश वांजळे यांनी सांगितले. तसेच उमेदवारी देताना राज ठाकरे काय म्हणाले?, असं विचारल्यानंतर जसं वाघाचं काम होतं (रमेश वांजळे) तसंच तुझं काम आहे. तु याच कार्यपद्धतीने पुढे चालत रहा..., असंही राज ठाकरे म्हणाले. तसेच ज्यावेळेस मी राज ठाकरेंना भेटायला गेलो तेव्हा मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले, ते म्हणाले मला वाटलं माझा रमेशचं आला, अशी माहितीही मयुरेश वांजळे यांनी दिली.
सध्या खडकवासलामध्ये भाजपचं वर्चस्व-
खडकवासला मतदारसंघ 2009 मध्ये निर्माण झाल्यानंतर दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी मनसेकडून निवडणूक लढवून विजय मिळवला. आमदार असताना रमेश वांजेळे यांनी मनसे स्टाइलने अनेक आंदोलने केली आणि विधिमंडळ देखील त्यांनी चांगलेच गाजवले होते. 2011मध्ये त्यांचे अकाली निधन झाले, त्यानंतर पोटनिवडणूक पार पडली. त्यावेळी भाजपने माजी नगरसेवक भीमराव तापकीर यांच्यावरती ही जबाबदारी दिली. वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांच्याविरोधात तापकीर 3625 मतांनी जिंकले. वांजळेंच्या पराभवानंतर खडकवासला मतदारसंघ भाजपच्या हाती आला. खडकवासला मतदारसंघात भाजप पक्षाला मानणारा मोठा मतदार आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये सलग तापकीर विजय मिळवत आले आहेत. 2011 नंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये ते विजयी झाले होते.