Pune Police : पुण्यातील दुचाकी चोरीवर पुणे (Pune Police) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कारवाईत गुन्हे शाखेने अनेक चोरट्यांना अटक केली असून 54 लाखांहून अधिक किमतीच्या 162 दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई मानली जात आहे.


पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सर्व गुन्हे शाखेच्या पथकांना चोरट्यांना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय आणि नितीन मुंडे यांनी कारवाई करत अनेक संशयितांना ताब्यात घेतले. नंतर आवश्यक कागदपत्रे देण्याचे आश्वासन देऊन चोरट्यांनी चोरीच्या दुचाकी ग्रामीण भागात स्वस्त दरात विकल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी संशयितांकडून 100 दुचाकी जप्त केल्या असून, अजय शेंडे हा चोरट्यांच्या टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती समोर आली आहे.


5 लाख 40 हजार रुपये किमतीच्या चौदा दुचाकी जप्त


युनिट पाचच्या पथकाने केलेल्या कारवाईत संकेत नामदेव भिसे, आदित्य बाळू मुळेकर आणि वैभव नागनाथ बिनवडे, सर्व रहिवासी हडपसर यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 5 लाख 40 हजार रुपये किमतीच्या चौदा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. बिनवडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.


क्राईम ब्रँच युनिट दोनने परभणी येथील भगवान राजाराम मुंडे यांच्यासह 19 दुचाकी ताब्यात घेतलं आहे आणि  अटक करण्यात आली. याशिवाय राहुल राजेंद्र पवार, गौरव उर्फ ​​पिंट्या मच्छिंद्र कुसळे, संतोष अशोककुमार सक्सेना उर्फ ​​समीर शेख, प्रशांत उर्फ ​​पप्पू सुबराव ठोसर यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 5 लाख 55 हजार रुपये किमतीच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.


दरोडा आणि वाहन चोरी प्रतिबंधक पथकाने किशोर उत्तम शिंदे, शाहिक कलीम शेख, अमन नाना कंचरे, नागनाथ अश्रीबा मेंढे यांच्याकडून 21 दुचाकी जप्त केल्या. त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आलं आहे. पुणे क्राईम ब्रँचची ही कारवाई गेल्या काही वर्षांतील शहरातील दुचाकी चोरींवरील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. पोलिस आयुक्त रतेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या पथकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि नागरिकांना आश्वासन दिले की ते शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत राहतील.