Pune APMC election : पुणे (Pune) जिल्ह्यातील नऊ बाजार समित्यांसाठी (Pune APMC election) आज मतमोजणी पार पडत आहे. यामध्ये हवेली, बारामती, दौंड, इंदापूर, भोर, मंचर आंबेगाव, नीरा पुरंदर, खेड, तळेगाव दाभाडे आणि मावळ या बाजार समित्यांचा समावेश आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तब्बल 20 वर्षांनी पुणे बाजार समितीची ही निवडणूक पार पडत आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. 


पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात मतदान  झाल्यावरच मतमोजणी करण्यात आली. कालच खेड बाजारसमितीचं चित्र स्पष्ट झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील काठावर पास झाले. त्यांच्या सर्व साधारण मतदार संघात ते शेवटच्या म्हणजे सातव्या क्रमांकावर राहिले आहेत. 1267 पैकी 589 मतं त्यांना मिळाली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता कायम राखण्यात ही यश आलं आहे. एकूण 18 जागांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला 10, सर्व पक्षीयांना 6 त्यात उद्धव ठाकरे शिवसेना 3, भाजप 2 आणि काँग्रेस 1 आणि अपक्ष 2 असा निकाल लागला आहे. त्यामुळे खेडमध्ये राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. 


काही वेळातच निकाल हाती येणार...


या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तर अनेक उमेदवारांचा भवितव्य मतपेटीत बंद झाला आहे. त्यांचं भवितव्य काहीच वेळात समोर येईल मात्र या निवडणुकीत नेते आपला गड राखणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार, असं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 


अजित पवार, विजय शिवतारे राहुल कुल यांची प्रतिष्ठा पणाला


बारामती, दौंड, इंदापूर आणि नीरा या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे मतदान काल झाले. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. बारामती बाजार समितीची मतमोजणी येथील रयत भवन येथील मतमोजणी सुरू आहे. अवघ्या काही वेळातच कल हाती यायला सुरुवात होईल. विरोधी पक्षनेते अजित पवार, विजय शिवतारे, राहुल कुल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


मतमोजणी थांबवून कर्मचाऱ्यांचा नाष्ट्यावर ताव...


मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी अर्धा तासांतच थांबली. मतमोजणी थांबवून कर्मचारी नाष्ट्यावर ताव मारत आहेत. स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी घुले यांच्या सुचनेनंतर कर्मचाऱ्यांनी मतमोजणी थांबवली आणि केंद्रातच सगळ्यांनी नाष्ट्याला सुरुवात केली आहे. त्यामुळं नाष्टा संपल्यावर पुढची मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणीचा हा वेग पाहता अंतिम निकाल यायला उशीर होण्याची शक्यता आहे.