पुणे : राज्याच सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. अशातच अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः लॉकडाऊन, तर काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू करण्याता आली आहे. अशातच पुण्यातही कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यात अपुऱ्या वैद्यकीय सुविधांचा पुन्हा एकदा नागरिकांना सामना करावा लागत आहे. पुण्यात कोरोना रुग्णांसाठी कोणी बेड देतं का बेड? अशी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. यापूर्वीही पुण्यात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट पाहायला मिळाला होता. अशातच त्यावेळीही उपचारासाठी बेड मिळवताना रुग्णांची ससेहोलपट होत असल्याचं पाहायला मिळत होता. तसेच अनेक कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर बेड मिळू न शकल्यानं उपचारांअभावी जीवही गमवावा लागला होता. 


पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल (रविवारी) एकाच दिवसांत जवळपास 4 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अनेक रुग्णांना बेड मिळवण्यासाठी ससेहोलपट करावी लागत आहे. शहरातल्या प्रमुख रुग्णालयांमधील तर जवळपास सर्वच प्रकारचे बेड भरले आहेत. 


पुण्यातील रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होऊ लागल्यानंतर पुण्यातील खाजगी रुग्णालयांमधील 50 टक्के बेड प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात येतील असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं होतं. परंतु, त्यानंतरही खाजगी रुग्णालयांनी दाद न दिल्यानं हे बेड आरोग्य यंत्रणेच्या ताब्यात आलेले नाहीत. तर कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत? याची माहिती देणारा डॅशबोर्डही गेल्या कित्येक दिवसांत अपडेट करण्यात आलेला नाही. त्यामुळे रुग्णांना बेड मिळणं आणखी अवघड झालं आहे. 



  • पुणे जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाजगी आणि सरकारी हॉस्पिटल्समध्ये मिळून 13 हजार 853 बेडची सोय करण्यात आली आहे. 

  • त्यापैकी 3 हजार 684 बेड सध्या उपलब्ध असल्याचं डॅशबोर्डवर दाखवण्यात येत आहे. 

  • यातील 1 हजार 291 ऑक्सिजन बेड सध्या रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. 

  • 365 आयसीयु बेड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. 

  • तर 177 व्हेंटिलेटर बेड सध्या पुण्यात उपलब्ध असल्याचं हा डॅशबोर्डवर दाखवण्यात येत आहे. 


रुग्णांना बेड मिळत नसल्याचा अनुभव पुण्यातील बहुतेकांना येत आहे. पुण्यातील संतोष वट्टमवार आणि विनोद इंगोले यांना त्यांच्या नातेवाईकांसाठी बेड मिळाले खरे परंतु त्यासाठी त्यांना अनेकांचा वशिला लावावा लागला आणि त्यामध्ये उपचारांसाठी महत्वाचा ठरणारा बहुमूल्य वेळ वाया गेला.  


पुण्यात खाजगी हॉस्पिटल्समध्ये हजारोंच्या संख्येने बेड उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. तरिही प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे? हे एबीपी माझाने स्वतः खाजगी रुग्णालयांमध्ये फोन करून खात्री करुन घेण्याचं ठरवलं. यावेळी काही रुग्णालयांकडून देण्यात आलेले फोन नंबर चक्क बंद लागत होते. तर काही रुग्णालयांकडून बेड उपलब्ध नाही आणि डॅशबोर्ड अपडेट करणं राहून गेलंय, अशी उत्तरं देण्यात आली . 


दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पुण्यात कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्यानं हाहाकार उडाला होता. अनेकांना त्यामुळे प्राणही गमवावे लागले होते. अशीच वेळ पुन्हा यायला नको असेल तर महापालिकेकडून नक्की बेड कुठे उपलब्ध आहेत? याची व्यवस्थित माहिती पुणेकरांना देणं आवश्यक आहे. तसेच, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खाजगी रुग्णालयांचे बेड महापालिकेने स्वत:च्या ताब्यात घेऊन ते लोकांना उपलब्ध करून द्यायला हवेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :