Pune News :   साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त अनेक लोक सोनं आणि नव्या वस्तू खरेदी करण्यावर भर देतात. अनेक लोक मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करण्याला पसंती देतात. तर अनेक लोक नवी गाडी खरेदी करण्याला पसंती देत असतात. गुढीपाडव्याला गाडी खरेदी करण्यासाठी अनेक लोक सुरुवातीपासूनच प्लॅनिंग करत असतात. यंदा पुणेकरांनी भरपूर प्रमाणात गाड्यांची खरेदी केली आहे. आकडेवारीनुसार 7 मार्च ते 21 मार्च या कालावधीत पुणेकरांनी सगळ्या प्रकारच्या गाड्या मिळून तब्बल 11, 964 वाहनांची खरेदी करण्यासाठी नोंदणी केली आहे. 


गुढीपाडवा, अक्षयतृतीया आणि दसरा या शुभ मुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांची रेलचेल असते. विशेषतः गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन, वस्तू खरेदी शुभ मानली जाते. हा मुहूर्त साधत अनेकजण घर, सोने, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदी करतात. यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी नागरिकांनी पसंती दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे 7 ते 21 मार्च या पंधरा दिवसाच्या कालावधीत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात 11 हजार 964 वाहनांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 8 हजार 11 दुचाकी तर, 1 हजार 933 कारची संख्या आहे. 


यानंतर रिक्षा आणि इतर वाहनांचा समावेश आहे. वाहन खरेदीसाठी नागरिकांना आकर्षित करण्यासाठी यंदा वाहन विक्रेत्यांकडून देखील आकर्षक योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. दुचाकीवर हेल्मेट, अ‍ॅक्सेसरीज मोफत देवून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नागरिकांनी देखील या योजनेला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. पुण्यात दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरासरी दहा ते बारा हजार वाहनांची नोंद होते. यामध्ये सर्वाधिक संख्या ही दुचाकींची असते. यंदाही दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक आहे. दरम्यान, गतवर्षी 19 मार्च ते 2  एप्रिल या पंधरा दिवसांच्या कालावधीत  11 हजार 466  वाहनांची नोंद झाली होती. त्यामूळे यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी वाढल्याचे दिसून येत आहे.


यंदा ई-वाहन खरेदीत वाढ


पुण्यात सध्या ई-वाहनांची क्रेझ वाढत आहे.  त्यामुळे अनेक पुणेकरांनी यंदा ई-वाहनं खरेदीलादेखील पसंती दिली आहे.यामुळे यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरात 1 हजार 692 नव्या वाहनांची नोंद झाली आहे. यात 1 हजार 588 दुचाकी आणि 90 कारचा समावेश आहे.