Pune crime news :  चहा सांडल्याच्या वादातून तरुणावर (crime news) धारधार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  चहा सांडल्याचा राग मनात धरून दोघांनी मिळून तरुणावर वार केले आहेत. पुण्यातील बिबेवाडी परिसरातील ही घटना घडली आहे. या प्रकरणी उदय साळवे (19) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणात राहुल राठोड, अंकुर जाधव असे आरोपींची नावे असून ही सगळी घटना 18 मार्च रोजी रात्री 8.30 वाजता घडली.


तक्रारदार आणि त्याचा मित्र संतोष जाधव हे दोघे ही 18  तारखेला रात्री बिबेवाडी परिसरात असलेल्या एका चहाच्या दुकानात चहा पिण्यासाठी गेले होते. त्याच वेळी आरोपी राहुल राठोड आणि अंकुर जाधव हे देखील त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबले होते. आरोपी आणि फिर्यादी हे दोघेही एकमेकांना ओळखत होते. दरम्यान, तक्रारीनुसार, संतोषचा आणि आरोपींचा चहा सांडण्यावरून त्या ठिकाणी वाद झाला.या गोष्टीचा राग मनात ठेऊन त्या दोन्ही आरोपींनी दुसऱ्या दिवशी फिर्यादी याच्यावर हल्ला करायचे ठरवले. बिबेवाडीमध्ये असलेल्या साईनगर भागातून फिर्यादी उदय जात असताना त्या दोघांनी त्याचा पाठलाग करून त्याच्या कमरेवर हाताने आणि धारधार शस्त्राने मारहाण केली यात उदय जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याला कोर्टात हजर करण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे.


पुण्यात मारहाणीच्या घटना वाढल्या..



पुण्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी नवले पुलाजवळील चव्हाण रुग्णालयातील एक अधिकारी आणि एका व्यक्तीचा वाद सुरू होता. त्यावेळी तेथील 34 वर्षीय मयूर दांगट हे त्यांची रुग्णवाहिका घेऊन तेथे थांबले होते. दांगट यांनी त्यांच्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, वाद घालणाऱ्या व्यक्तीने 'मी पठारावरील भाई आहे. तुला जिवंत सोडणार नाही,' असे म्हणत दांगट यांच्या डोक्यात दांडके मारून गंभीर जखमी केले. तसेच त्याच्या अन्य दोन साथीदारांनी दगडाने मारहाण केली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


पुण्यातील भाईंना चाप कधी?


पुण्यात कोयता गॅंगनंतर भाईगिरीच्या दहशतीचं प्रमाण वाढत आहे. शुल्लक कारणावरुन मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवसभरात किमान दोन परिसरात मारहाणीच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे पुणे पोलीस यांच्यावर कारवाई कधी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.