पुणे : पुणे तिथे काय उणे हे आपण कायम ऐकतो. पुणेकर कधी काय करतील याचाही काही नेम नाही. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पुण्याची (Pune News) नेहमीच चर्चा होत असते. पुणेकरांचं तिरकसं बोलणं आणि पुणेकरांचा मदत करण्याचा स्वभाव या कोणत्या ना कोणत्या कारणाने पुणे नेहमीच चर्चेत असते. आज पुन्हा चर्चेत आले ते घरात मांजर पाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या परवान्यामुळे... पुण्यात जर घरात मांजर (Cat) पाळायाचे असेल तर आता त्यासाठी पुणे महापालिकेचा (Pune Muncipal Corporation) परवाना घ्यावा लागणार आहे.
घरात मांजर पाळायचे असेल तर आता त्यासाठी पुणे महापालिकेचा (Pune Muncipal Corporation) परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. पुढील आठ दिवसांत परवान्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे. महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार मांजर, कुत्रा, घोडे (Pets) अशा पाळीव प्राण्यांना घरी ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करून त्यासाठी रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे.
मांजराची नोंदणी करण्यासाठी वर्षाला 50 रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे. तसेच रहिवासी पुरावा (Documents), लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजराचा फोटो ही कागदपत्रे बंधनकारक असणार आहेत. तसेच दरवर्षी त्या परवान्याचे नूतनीकरण करून 50 रुपये परवाना शुल्कशिवाय अतिरिक्त 25 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
आत्तापर्यंत केवळ कुत्रा (Dog) आणि घोडे (Horses) पाळण्यासाठीच परवानगी दिली जात होती. आता मात्र मांजर पाळण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. प्रामुख्याने अनेकदा शेजारच्या घरात मांजर पाळल्याचा त्रास झाल्याच्या तक्रारी पालिकेकडे येत असतात. काही ठिकाणी एका घरात दहा ते पंधरा मांजरे पाळली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. पाळलेल्या मांजरीवरून झालेले वाद पोलिस स्टेशनपर्यंत जाण्याचे प्रकार घडले आहेत.
भारतात जवळपास 2 कोटी 2 लाख पाळीव प्राणी आहेत, ज्यापैकी सुमारे 54 लाख पाळीव प्राणी हे महाराष्ट्रात आहेत. या पाळीव प्राण्यांमध्ये 80 टक्के प्राणी कुत्रे किंवा मांजर या स्वरूपाचे आहेत. तर इतर 20 टक्केमध्ये कासव, पक्षी, मासे, ससा अशांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :