Sushma Andhare Pune : संजय राऊत(Sanjay raut) आज मवाळ बोलले नाहीत तर मोठ्या लढाईसाठी ते वॉर्मअप करत आहेत, असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं आहे. मोठ्या लढाईची सुरुवात करताना वार्मअप करण्याची गरज असते. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यावर संजय राऊत यांनी मवाळ भाषा वापरली, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. आजची भाषा जरी मवाळ वाटली असेल मात्र काहीच दिवसात त्यांचा रिदम दिसणार आहे, असंही त्या म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे फक्त एका पक्षाचे गृहमंत्री नाहीत. ते संपूर्ण राज्याचे आणि देशाचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी त्या प्रमाणे वागलं पाहिजे. हाच सल्ला देण्यासाठी संजय राऊत कदाचित भेट घेणार असतील. ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोगाचा दुटप्पीपणा आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. यंत्रणांचा गैरवापर भारतीय पक्षाकडून होत आहे. यापूर्वी गल्ली ते दिल्लीपर्यंतची सत्ता कॉंग्रेसच्या हातात होती. त्यावेळी असं सुडाचं राजकारण कधीही झालं नाही मात्र भाजपाकडून हे सुडाचं राजकारण होताना दिसत आहे, असा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.
"निर्दोश असणाऱ्या माणसाला अटक करतात"
या प्रकरणाचे मुख्य आरोपी राकेश वादवान यांना अटक करण्यात आली नाही. मात्रा राऊतांसारख्या निर्दोश असणाऱ्या माणसाला अटक केली. तेव्हा ईडीचे वर्तन संशयास्पद वाटणारं आहे, असं कोर्टाने म्हणायला हवं. ईडी आणि म्हाडा हे कोणासाठी काम करतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कोर्टाच्या निर्णयावर आम्ही विश्वास ठेवला तर लोकांचा न्यायदेवतेवरचा विश्वास उडायला वेळ लागणार नाही, असंदेखील त्या म्हणाल्या. विश्वास कायम ठेवायचा असेल तर संजय राऊतांना जामीन मंजूर करावाच लागेल आणि त्यांना बाहेर काढावं लागणार असल्याचंही त्याचं म्हणणं आहे.
'लवकरच संजय राऊतांना भेटणार'
मी पक्षात प्रवेश घेतल्यापासून संजय राऊत आणि माझी भेट झाली नाही. मात्र आता मी दोन दिवसांनी मुंबईत जाऊन त्यांची भेट घेणार आहे. राजकारणाबात त्यांच्याकडून काही खास टिप्स घेणार आहे. तीन महिन्याचं बाळ म्हणून माझ्यावर सातत्याने टीका केली जाते. त्यामुळे लांब पल्ल्याची तोफ धडाडण्यासाठी काय करावं?, यासाठी मी राऊतांकडून सल्ला घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
'सगळे प्रश्न फक्त देवेंद्र फडणवीसांनाच विचारणार'
दिपाली सैय्यद यांनी माझ्यावर अनेक टीका केल्या आहेत मात्र काय बोललं यापेक्षा कोण बोललं याकडे मी जास्त लक्ष देते त्यामुळे त्यांच्या टीकवर प्रतिक्रिया देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या टीका गांभीर्याने घेण्याची गरज नाही मात्र या सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीस ज्यावेळी बोलतील त्यावेळी मी सगळ्या टीकेचा जाब त्यांना विचारणार आहे, असं त्या म्हणाल्या. सुषमा अंधारेंनी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटलांवरदेखील निशाणा साधला आहे. बापू आमचा वाघ बाहेर आला आहे त्यामुळे बापू तुमचं काही खरं नसतंय, अशा भाषेत त्यांनी शहाजी बापूना खडेबोल सुनावला.