Sushma Andhare : शिंदे- ठाकरे गटातील वाद काही थांबता थांबत नसून एकमेकांवर सतत टीका सुरूच आहे. दरम्यान आमदार संजय शिरसाट  यांनी  छत्रपती संभाजीनगरमधील मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे  यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी  सुषमा अंधारेंनी शिरसाटांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी महिला आयोगाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी  सुषमा अंधारेंनी केली आहे


सुषमा अंधारे या त्यांच्या अनेक सभेतून विरोधकांवर जहरी टीका करत असतात. अनेक भाषणात त्यांनी आमदारांचा भाऊ म्हणून उल्लेख करतात. त्यावरुन संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. संभाजीनगरमध्ये बोलत असताना त्यांची जीभ घसरली. या वक्तव्यामुळे आता संजय शिरसाट अचडणीत येण्याची शक्यता आहे. शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावरुन सुषमा अंधारेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी रितसर तक्रार दाखल केली आहे आणि जोपर्यंत शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असं त्या म्हणाल्या आहेत.  शिवसेनेत आमचं आयुष्य गेलं आहे.  आम्ही शिवसेनेत अनेक वर्ष घालवली आहेत आणि आता नवीन आलेले लोक आम्हाला मार्गदर्शन करत आहेत' असे शिरसाट म्हणाले 


दानवेही आक्रमक..


शिरसाट यांचे वक्तव्य फक्त गुन्हेगारी प्रवृत्तीचा आणि क्रिमिनल लॉ मध्ये बसणारे आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्तांकडे आपण तक्रार देणार असून कायदेशीर प्रक्रियेत कोणता गुन्हा दाखल होतो हेही त्यांना आम्ही सांगणार असल्याचे दानवे म्हणाले. 


रूपाली पाटील ठोंबरेंची टीका...


दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरेनी देखील संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे. सुषमाताई अंधारे या रामा इंटरनॅशनलला उतरतात की ताज हॉटेलला उतरतात, त्यांच्या राहण्या खाण्याची काळजी आणि खर्च करण्यासाठी त्यांचा पक्ष अत्यंत खंबीर आहे. त्यामुळे मिंधे गटातल्या गद्दारांनी फार तर खोक्यांमधून मिळालेल्या पैशांनी गुवाहाटीच्या सहली कराव्यात. तर शिरसाट यांना अत्यंत आपुलकीचा सल्ला वजा इशारा असून, सुषमाताई अंधारे यांच्यासारख्या कायद्याने चालणाऱ्या आणि शून्यातून स्वतःचे ओळख उभी करू पाहणाऱ्या महिलेला एकाकी समजू नयेत. तसेच जर तुम्ही गलिच्छ पद्धतीने वार करण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा गाठ महाराष्ट्रातल्या तमाम जिजाऊ सावित्रीच्या लेकींशी आहे, असे रूपाली पाटील ठोंबरेनी म्हटले आहे.