Pune Crime News : 'माता न तू वैरिणी' या म्हणीचा प्रत्यय पुण्यात (Pune) आला आहे. क्रूरतेची परिसीमा गाठत एका महिलेने आपल्या पोटच्या चार वर्षीय मुलीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या (Murder) केली. पुण्यातील हडपसर (Hadapsar) भागात काल (27 मार्च) रात्री ही धक्कादायक घटना घडली. वैष्णवी महेश वाडेर असं हत्या झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आईला (Mother) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


आरोपी महिला मुलीसोबत राहत होती 


सिद्धिविनायक दुर्वांकूर सोसायटी ससाणे नगरमध्ये सोमवारी (27 मार्च) रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही तिच्या चार वर्षीय मुलीसोबत एकटीच राहत होती. काही दिवसांपूर्वीच ही या ठिकाणी राहायला आली होती. ती बेकरी प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय करत होती. सोमवारी ती भाड्याचे घर खाली करणार होती. यासाठी घरमालक तिथे गेले होते. त्यावेळी तिने दरवाजा आतून बंद करुन घेतला होता. घर मालकाने दरवाजा ठोठावूनही महिलेने दरवाजा उघडला नाही. अखेर शेजारच्यांनी महिलेला दरवाजा उघडण्यास सांगितलं. दरम्यान यानंतर महिलेने दरवाजा उघडला. घरमालक आणि शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिलं असता मुलीचा मृतदेह आढळून आला. चार वर्षीय चिमुकलीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. त्यांनी तात्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) घटनास्थळी धाव घेतली.


हत्येचं कारण अस्पष्ट


पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. तर आरोपी महिला कल्पना वाडेर हिला ताब्यात घेण्यात आलं आहे. या महिलेने नेमकं कोणत्या उद्देशाने हत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हडपसर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. 


पुण्यातील गुन्हेगारी वाढली


पुण्यात सातत्याने गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे. रोज पुण्यात नवे गुन्हे समोर येत आहेत. चोरी, खून, महिलांवरील अत्याचार, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. शिवाय कोयता गँग, चुहा गँगचीही दहशत पाहायला मिळते. अशातच आता हडपसरमधून ही हादरवणारी घटना समोर आली आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर उभं राहिलं आहे. 


हेही वाचा


Pune Crime News : आईच ठरली वैरी! अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पोटच्या तीन वर्षीय चिमुकलीची प्रियकराच्या मदतीने हत्या