Sanjay Raut :  खासदार संजय राऊत आज पुणे जिल्ह्यातील वरवंडमध्ये सभा घेणार आहे. त्यापूर्वी ते भीमा-पाटस कारखान्यात कारखान्याचे संस्थापक मधुकर शितोळे यांना अभिवादन करायला निघाले असता त्यांचा पोलिसांनी ताफा अडवला. कारखान्याच्या काही अंतरावर त्यांना पोलिसांनी कारखान्याकडे जाण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर फक्त संजय राऊत यांचीच गाडी कारखान्याकडे सोडण्यात आली. यावेळी परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. ताफा अडवल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.


खासदार संजय राऊत भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर जाऊन कारखान्याचे संस्थापक मधुकर शितोळे यांच्या पुतळ्याला अभिवादन करायला जात असताना त्यांचा ताफा अडवण्यात आला. परंतु प्रशासनानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांना परवानगी नाकारली होती. तसेच कारखाना परिसरात कलम 144 लागू करण्यात आले. प्रशासनाने परवानगी नाकारली असली  आम्ही त्या ठिकाणी जाऊन अभिवादन करणार असं संजय राऊत यांनी म्हटलंय.


कारखान्याचे संस्थापक मधुकर शितोळे यांच्या पुतळ्याला अभिवादन करायला गेले असता ते म्हणाले की ही जनतेची प्रापर्टी आहे, ही काही खासगी प्रॉपर्टी नाही आहे. मला अडवलं जात आहे, ही नुसती हुकुमशाही आहे, असं ते म्हणाले. मी अनेक वर्षांपासून खासदार आहे मला या लोकांनी दरवाजा बंद केला आहे, ही केवळ गुंडशाही सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 


यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, मी या कारखान्यात आल्यावर तुम्हाला नेमकी कशाची भीती वाटत आहे आणि जर भीतीच वाटत असेल तर आमच्या समोर या, असं आव्हानदेखील दिलं आहे. मी फक्त अभिवादन करण्यासाठी आलो आहे. शितोळे यांच्या पुतळ्याचा हार घालणार आणि सभेला रवाना होणार आहे, सार्वजनिक कारखान्यात  NOC लागते हे मला आज समजलं असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 


वरवंडमध्ये होणार सभा...


पुणे जिल्ह्यातील वरवंडमध्ये संजय राऊत सभा घेणार आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर संजय राऊतांनी गंभीर आरोप केले होते. दोंडमधील भीमा-पाटस कारखान्यात भष्ट्राचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. वरवंडमधील नागनाथ शाळेच्या पटांगणावर ही सभा होणार आहे. या सभेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संजय राऊत या सभेत काय बोलणार?, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. 
.