Pune Water Cut : पुणेकरांसाठी (Pune News) दिलासादायक बातमी आहे. पुणेकरांवर घोंघावणारं पाणी कपातीचं संकट तूर्तास टळलं आहे. पुणे आणि ग्रामीण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवणार का?, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आज झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणीकपात होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 15 मेपर्यंत पुणेकरांची पाणीकपात टळली आहे. 15 मेनंतर पुन्हा एकदा संपूर्ण आढावा घेण्यात येणार असून त्यानंतर पाणीकपातीसंदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. 


पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पुण्यातील आमदार देखील उपस्थित होते. पुणे शहराला आणि ग्रामीण भागाता जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा सध्या जिल्ह्यातील चार धरणांमध्ये शिल्लक आहे. खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चारही धरणात एकूण 11.52 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी कपात करावी लागण्याची शक्यता होती. याच विषयावर संविस्तर चर्चा या बैठकीत झाली. त्यानंतर संपूर्ण पाणी साठ्याचा आढावा घेऊन पुण्यात पाणी कपातीचा न करण्याचा निर्णय घेतला. येत्या 15 मेपर्यंत पुणेकरांना पाणीकपातीपासून दिलासा मिळाला आहे. 


दरवर्षी 15 जुलैपर्यंत पाण्याचं नियोजन करुन उपलब्ध असलेल्या धरणातील पाणी साठ्यातून महापालिका आणि शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाला विलंब होण्याचा आणि पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वेधशाळेने आणि इतर हवामान अभ्यासकांनी सांगितल्याने प्रशासन सतर्क झाल्याचं बघायला मिळत आहे.  त्यामुळे प्रशासनाने 31 ऑगस्टपर्यंतचं पाणी साठ्याचं नियोजन करण्याची तयारी केली आहे. 


पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणं मिळून एकूण 11. 52 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. खडकवासला - 1.07 टीएमसी, पानशेत - 3.41 टीएमसी, वरसगाव - 6.75 टीएमसी,  टेमघर - 0.28 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी कालवा समितीची बैठक बोलवली होती. या बैठकीत पाणीसाठा नियोजनासंदर्भात चर्चा झाली आणि त्यानंतर पाणी कपात सध्याच होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला.


पुणे जिल्ह्याच्या महत्त्वाच्या बैठकीला अजित दादांची दांडी


या बैठकीला अजित पवारदेखील उपस्थित राहणार होते. मात्र ऐनवेळी बैठकीची वेळ पुढे ढकलल्यामुळे अजित पवारांनी या बैठकीला दांडी मारली आणि ते मुंबईतील नियोजित कार्यक्रमाला निघून गेले.