Har Har Mahadev Row : 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची मान्यता आहे तर शो रद्द करण्याचे कारण काय आहे, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) उपस्थित केला आहे. पुण्यात बंद केलेले हर हर महादेव चित्रपटाचे शो आज दुपारपासून पुन्हा सुरु केले जाणार आहेत. हिंदू जननायक राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी जर कोणी चित्रपट बंद करण्याचा प्रयत्न करणार असेल तर खळ्ळखट्याक होणार, अशी प्रतिक्रिया मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिली आहे.
हर हर महादेव चित्रपटाला मनसेने पाठिंबा दर्शवला आहे. पुण्यातील थिएटरमध्ये या चित्रपटाचे शो दाखवले गेले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. कोणाच्याही दबावाखाली येत चित्रपटाचे शो बंद करु नका, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित हर हर महादेव हा चित्रपट प्रसारित करण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे आमनेसामने आले आहेत. याचे पडसाद पुण्यातही उमटले आहेत.
मनसे सर्व चित्रपटगृहांचा आढावा घेणार
पुण्यात आज दुपारपासून हर हर महादेव या चित्रपटाचे शो सुरु करण्यात येणार आहे. त्यावेळी अनेक ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी आणि मनसे पुन्हा आमनेसामने येण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे मनसेचे नेते आणि कार्यकर्ते दुपारनंतर पुण्यातील विविध चित्रपटगृहांचा आढावा घेणार आहे.
संभाजी ब्रिगेड आक्रमक
छत्रपती संभाजीराजेंच्या आक्षेपानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली होती. पुण्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपट बंद पाडला होता. विशाल टॉकीजमध्ये हा शो सुरु होता, तेव्हाच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते थिएटरमध्ये घुसले. थिएटरमध्ये असणाऱ्या सर्व प्रेक्षकांना बाहेर काढून त्यांनी हा शो थांबवला होता. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरणात निर्माण झाले होते.
मुंबईतदेखील मनसेने सुरु केला बंद पडलेला शो
7 नोव्हेंबरला विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला सिनेमाचा शो राष्ट्रवादी काँग्रेसने बंद पाडला होता. प्रेक्षकांसोबत राडा झाला आणि त्यानंतर मनसेने विवियाना मॉलमधील जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडलेला सिनेमा पुन्हा सुरु केला होता. त्यानंतर काल (8 नोव्हेंबर) विवियाना मॉलमध्ये मनसेच्या वतीने हर हर महादेव सिनेमाचा मोफत शो दाखवण्यात आला. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मराठा मावळ्यांचा इतिहास चुकीचा दाखवल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे आणि हा सिनेमा दाखवला जाऊ नये अशी मागणी केली आहे. दाखवलेल्या चुकीच्या इतिहासामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. पण या लढाईत आता मनसेने उडी घेतली असून सिनेमा दाखवला जावा असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आता हर हर महादेव सिनेमावरुन जोरदार राजकीय घमासान सुरु झाल्याचं चित्र आहे.