Pune Crime : केस कापण्यासाठी एका सलूनमध्ये (Saloon) गेलेल्या सात वर्षीय अनैसर्गिक कृत्य (Unnatural Act) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune) घडली आहे. सलूनमधील कामगारानेच हे घृणास्पद कृत्य केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या कामगाराला अटक केली आहे. सज्जन सहेआलम सलमानी (वय 20 वर्षे) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी कामगाराला बेड्या ठोकल्या.
संबंधित मुलाची आई सोमवारी (7 नोव्हेंबर) त्याला घेऊन केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेली होती. परंतु सलूनमध्ये वेळ लागणार असल्याने ही महिला घरी गेली. याचा फायदा घेत गर्दी ओसरल्यानंतर कामगाराने या सात वर्षांच्या मुलाला आतील खोलीत नेलं. इथे त्याच्यासोबत अश्लील चाळे करुन अनैसर्गिक कृत्य केलं. तसंच या गोष्टीची वाच्यता केल्यास जीवे मारु अशी धमकीही कामगाराने मुलाला दिली. त्यानंतर या कामगाराने मुलाचे केस कापून त्याला घरी पाठवलं.
बिथरलेल्या मुलाने सलूनमध्ये घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलाच्या वडिलांनी विमानतळ पोलिसात संबंधित कामगाराविरोधात तक्रार दाखल केली. याची दखल घेत पोलिसांनी सज्जन सलमानी याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार (पॉक्सो) गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
लैंगिक अत्याचाराच्या घटनेत वाढ
पुण्यात अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. शाळेतील समुपदेशनातून या प्रकारच्या घटना वारंवार समोर येत आहे. देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचं सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. सप्टेंबर महिन्यात पुण्यातील एका फार्महाऊसमधील कर्मचारी क्वार्टरमध्ये राहणाऱ्या 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्याच परिसरात राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केला होता. हा तरुण मुलीच्या कुटुंबाशी संबंधित होता आणि कायम संपर्कात असायचा. तर त्याआधी कोंढवा परिसरात हादरुन टाकणारी घटना उघडकीस आली होती. या परिसरातील एका 35 वर्षाच्या व्यक्तीने दहा वर्षाच्या मुलीला खेळण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले होते.