Pune News:  देशासह महाराष्ट्रातील महागाई विरोधात पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. जंगली महाराज रोडवरील झाशी राणी चौकात आठवडी बाजार भरवून राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात आलं. मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढत आहे, पेट्रोलचे भाव गगणाला भिडले आहे. नागरिकांचा यात मानसिक, आर्थिक छळ होत आहे, असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.


या आंदोनलाच्या वेळी मोदींंनी काय दिलं? गाजर दिलं गाजर दिलं, अशा घोषणाबाजी करण्यात आली. मोदींच्या आश्वासनाचा हा बाजार आहे. 2014 साली मोदींनी अनेक आश्वासन दिलं मात्र एकही पुर्ण केलं नाही त्याउलट प्रचंड प्रमाणात वस्तुंच्या किंमती वाढवल्या. भाजीपासून तर सिलेंडरपर्यंत किंमती वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्याचं जगणं मुश्किल केलं आहे. मोदींनी गाजर दाखवून अनेक आश्वासनं दिली होती त्यामुळे आज आम्ही गाजर घेऊन आणि आठवडी बाजार भरवून हे आंदोलन करत आहोत. यापुर्वी देखील आम्ही अनेकदा आंदोलन छेडले होते. मात्र आज जीवनावश्यक वस्तुंचा बाजार मांडून नागरिकांना कोणत्याच वस्तू स्वस्तात मिळत नाही आहे, हे दाखवून देण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घेतली आहे.



आठवडी बाजार भरवून पहिल्यांच असं आगळंवेगळं आंदोलन आम्ही करत आहोत. हे आमच्या आस्तित्वाचं आंदोलन आहे. महागाई कमी करा नाही तर चले जाओ असं म्हणत आम्ही आज आंदोलन करत आहोत. गाजर दाखवून मोदींनी महागाई वाढवून सामान्य नागरिकांचा मोदी सरकार छळत आहे. त्यामुळे मोदींच्या नावाचा बाजार भरवला आहे, असं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी सांगितलंय.


आंदोलकांनी पुण्यातील रस्त्यावर चक्क जीवनावश्यक वस्तूचा बाजार मांडत त्याला मोदी महागाई बाजार असं नावं दिलं आहे. या बाजारात केळी, गाजर, भाज्या, मासे, पुस्तकं यासगळ्या वस्तू ठेवण्यात आल्या आहे. महागाई कमी केली नाही तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ अशा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यानी दिला आहे.