Pune News : राज्य गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून (Survey of State Intelligence Agencies) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील काही वर्षात पुण्यात पाच हजार बांगलादेशी नागरिक वाढले असून इतरही जिल्ह्यात ही संख्या वाढल्याचं बोललं जातंय. पोलिसांकडून (Pune Police) बांग्लादेशींवर कारवाई होताना दिसत नसल्याने घुसखोरांचे फावल्याचे दिसत आहे. त्यामुळे बांग्लादेशी नागरिकांची घुसखोरी हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  


दरम्यान बांग्लादेशी नागरिकांची (Bangladesh) घुसखोरी रोखण्यात यावी, तसेच त्यासाठी विशेष शोध मोहीम प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत राबवण्यात यावी, असे पोलिसांना खरं तर आदेश आहेत. यात बांग्लादेशी व्यक्ती शोधणे, त्यांची कागदपत्रांची पडताळणी करणे, त्यांचे साथीदार शोधणे तसेच त्यांची पाठवण करणे आदी कामे वेळखाऊ असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. याचाच परिणाम म्ह्णून सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात बांग्लादेशी घुसखोर मोठ्या संख्येने स्थायिक झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात गेल्या काही वर्षात तब्बल 5 हजार बांग्लादेशी कुटुंबासह पुण्यात वास्तव्यास आहेत. मात्र त्या तुलनेत मागील तीन वर्षात फक्त 5 बांग्लादेशीना पुन्हा मायदेशी पाठवण्यात आले आहे. 


पुण्यातील हडपसर (Hadapasar) परिसरातील ससाणेनगर, वाघोली, चाकण औद्योगिक क्षेत्र, लोणीकाळभोर (lono Kalbhor) या भागात बांग्लादेशानी आपले बस्तान बसवले आहे. सीमारेषा ओलांडत हे नागरिक भारतात येताच हॉटेल वेटर, बांधकाम मजूर, फेरीवाले आणि ईतर कामे करतात आणि हळू हळू एक करत कुटुंबासह ते ईथे स्थायिक होतात, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व भाड्याची खोली घेऊन राहतात. तसेच आम्ही मूळचे पश्चिम बंगालचे आहोत असं ते सांगतात. पुण्यासह नवी मुंबईत (Mumbai) देखील बांग्लादेशी नागरिकांचे प्रमाण हे वाढल्याचं बघायला मिळत आहे. नवी मुंबई पोलिसांकडून चालू वर्षी 22 जणांवर कारवाई करण्यात आली असून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी हे नागरिक रहात असल्याने कारवाईत अडचण देखिल निर्माण होते आहे. विशेष म्हणजे पुणे, नवी मुंबईतच नाही तर राज्यभर विविध जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात घुसखोर वास्तव्य करत असल्याची चर्चा आहे.  


पोलिसांनी लक्ष देणं गरजेचं


दरम्यान पोलिसांना विशेष शोध मोहीम राबविण्याचे आदेश असून त्यानंतर्गत बांगलादेशी घुसखोर शोधणे, त्याची ओळख पटवणे तसेच त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे, त्यांचे अजून कोणी साथीदार आहेत का? त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? या सर्वांचा तपास करणे अशा कामांना वेळ लागत असल्याने पोलिसांकडून या कारवाईकडे डोळेझाक केली जाते आहे का? असाच प्रश्न आता उपस्थित होतोय. सध्या महाराष्ट्रातील विविध भागात धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या घटना या घडत असतांनाच बांगलादेशी घुसखोरांमुळे आगामी काळात पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर उदभवणार नाही ना? याकडेही पोलिसांनी लक्ष देणं गरजेचं आहे..


इतर संबंधित बातम्या : 


भारताने घुसखोर बांगलादेशींची यादी द्यावी, आम्ही त्यांना मायदेशी बोलावू : बांगलादेश