Bala Waghere : पिंपरी चिंचवडमधील कुख्यात गुंड (Pune Crime News) बाळा वाघेरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पैशाच्या व्यवहारातून बाळा वाघेरे आणि त्याच्या साथीदारांनी एकाचे अपहरण केल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाल्यानंतर चिंचवड पोलिसांनी (Chinchwad Police) वाघेरेला त्याच्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. 


यासंदर्भात 29 वर्षीय व्यापाऱ्याने तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी बाळा वाघेरे, राहुल उणेचा आणि हरीश चौधरी (रा.वाल्हेकरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला. फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत बाळा वाघेरेला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.


नेमकं काय घडलं?


पिंपरी चिंचवडमधील कुख्यात गुंड बाळा वाघेरेच्या घरावर छापा टाकत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वाघेरेच्या घरात काल एका व्यापाऱ्याला अपहरण करुन आणण्यात आलं होतं. या व्यापाऱ्याचा वाल्हेकरवाडी येथील हरीश चौधरीसोबत आर्थिक व्यवहार झाला होता. मात्र ते पैसे व्यापाऱ्याने परत केले तरी चौधरी आणखी पैसे मागत होता. ते देण्यास व्यापाऱ्याने नकार दिला म्हणून त्याचं अपहरण करुन त्याला बाळा वाघेरेच्या घरी आणलं गेलं. तिथे ही त्याने नकारघंटा कायम ठेवल्याने, त्याला मारहाण करण्यात आली. पैसे देतो, असं म्हणून व्यापाऱ्याने तिथून कशीबशी सुटका करुन घेतली आणि थेट चिंचवड पोलीस स्टेशन गाठलं. मग पोलिसांनी वाघेरेला काही कळण्याआधी छापा टाकला आणि त्याला बेड्या ठोकल्या. बाळा वाघेरेवर या आधी अपहरण, खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.


राहत्या घरातच ठोकल्या बेड्या


सगळी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून या कुख्यात गुंडाला राहत्या घरातच बेड्या ठोकायला पोलिसांना यश आलं. आतापर्यंत पुण्यात अनेक गुन्हेगार पोलिसांनी गजाआड केले आहेत. सापळा रचून अनेकांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यात पिंपरी चिंचवडमधील कुख्यात गुंड बाळा वाघेरे याला राहत्या घरातूनच अटक केली आहे. 


पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीत वाढ


पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीत वाढ झाली आहे. अनेक टोळ्या सक्रिय आहेत. त्यामुळे दहशतदेखील निर्माण झाली आहे आणि नागरिकांना धास्ती बसली आहे. त्यात अशा प्रकारच्या कुख्यात गुंडांना किंवा गुन्हेगारांना पडकण्यात पोलिसांना यश आलं आहे. रोज नव्या गुन्ह्यांचा उलगडा करणं आणि अशा प्रकारच्या कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद करणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.