पुणे : पुण्यात सराईत गुन्हेगार आणि निवृत्त पोलीस कर्मचारी यांच्यात झालेल्या झटापटीत सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 12 एप्रिल रोजी ही घटना घडली. या सराईत गुन्हेगाराने दारुच्या नशेत रस्त्याने जाणार्‍या एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी अडवली. त्यानंतर या दोघांमध्ये झालेल्या झटापटीत गुन्हेगाराचा जीव गेला. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून निवृत्त कर्मचाऱ्याला अटक केली आहे.


या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झालं आहे. मनिष काळूराम भोसले (वय 20 वर्षे) अस सराईत गुन्हेगाराचं नाव आहे तर अनंत तुळशीराम ओव्हाळ (वय 61 वर्षे) असं अटकेत असलेल्या निवृत्त पोलिसाचं नाव आहे. मनिष भोसले हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. बोपोडी इथल्या आनंदनगर परिसरात तो राहत होता. शिवाय त्याला दारुचंही व्यसन होतं. तर अनंत ओव्हाळ हे रेल्वे पोलीस दलातून निवृत्त झालेले आहेत.


परवा संध्याकाळी पाचच्या सुमारास अनंत ओव्हाळ हे बोपोडीतील आनंदनगर परिसरात काही कामानिमित्त गेले होते. यावेळी मनिष भोसलेने त्यांची दुचाकी अडवत त्यांच्यासोबत वाद घातला. यानंतर दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला मनिषने अनंत ओव्हाळ यांना मारहाण केल्याचं दिसत आहे. यानंतर अनंत यांनीही त्याला मारहाण केली. त्यानंतर खाली पडलेल्या मनिषच्या छातीत अनंत ओव्हाळ यांनी लाथा घातल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. 


दरम्यान सीसीटीवी फूटेज हाती आल्यानंतर खडकी पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आणि अनंत ओव्हाळ यांना अटक केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.