पुणे : कोरोनामुळे पुण्यात भीतीचे वातावरण असल्याने अनेकदा कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारांसाठी मृतांचे नातेवाईक पुढे येण्याचं टाळतात. अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी गेल्या वर्षभरापासून मुस्लीम मूल निवासी मंचचे अठरा कार्यकर्ते पार पाडत आहेत. मागील वर्षभरात त्यांनी पीपीई किट घालून एक हजार 80 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत, ज्यामध्ये सर्वधर्मीयांचा समावेश आहे. 


सायरन वाजवत अॅब्युलन्स स्मशानभूमीत पोहोचली की मुस्लीम मूल निवासी मंचचे कार्यकर्ते पुढे सरसावतात आणि अंत्यसंस्कारांची तयारी सुरु होते. सर्वात आधी पीपीई किट आणि हॅण्ड ग्लोव्ज घालून ते स्वतःला सुरक्षित करतात आणि त्यानंतर मृत पावलेली व्यक्ती ज्या धर्माची आहे, त्या धर्मातील परंपरेनुसार अंत्यविधीची सुरुवात होते. मागील वर्षभर मुस्लीम मूल निवासी मंचचे हे कार्यकर्ते विनामोबदला अशाप्रकारे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करत आहेत. 


मागील वर्षी मार्च महिन्यात पुण्यात कोरोनाने पहिला बळी घेतला आणि त्यानंतर मृत्यूचं तांडव वाढतच गेलं. या काळात काही मृतदेह असे होते की त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांनी पुढे येण्याचंही टाळलं. तर अनेकदा एकट्या-दुकट्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार कसे करायचे हा प्रश्न पडायचा. अशावेळी हे कार्यकर्ते मदतीसाठी धाऊन यायचे. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, लिंगायत अशा वेगवेगळ्या धर्मातील व्यक्तींच्या मृतदेहांवर या काळात त्यांनी अंत्यसंस्कार केले. 


हे काम करण्यासाठी या कार्यकर्त्यांना महापालिकेच्या वतीने पीपीई किट आणि हॅण्ड ग्लोव्ज पुरवले जातात. बाकी येण्या-जाण्याचा खर्च हे कार्यकर्ते स्वतः उचलतात आणि त्यासाठी कोणताही मोबदला घेत नाहीत.


जिथे गरज असेल त्या स्मशानभूमीत किंवा दफनभूमीत हे कार्यकर्ते स्वतः पोहोचतात. त्यासाठी या अठरा जणांनी त्यांचे तीन गट तयार केले आहेत. विशेष म्हणजे वर्षभरात जवळपास अकराशे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या या अठरा जणांपैकी कोणालाही कोरोना झालेला नाही. 


मागील वर्षभरात कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत अशाप्रकारे माणुसकीचं दर्शन अनेकांनी घडवलं आहे. पण मृतदेह आणि स्मशान म्हटलं की, अंगावर सरसरुन काटा येण्याच्या सध्याच्या परिस्थितीत या अठरा जणांनी माणुसकीबरोबरच हिंमतीचेही उदाहरण घालून दिलं आहे.