पुणे : जिंकलेल्या पैलवानाला गदा दिली जाते. परंतु, कधीही कुस्तीचा लंगोट न नेसलेल्या अजित पवारांना तुम्ही गदा दिली. तलवार आम्हाला नेहमी दिली जाते. पण, तुम्ही दिलेली गदा मलाही कळेना ती कुठं ठेवावी, कशी धरावी. त्यामुळे गदा ही पैलवानाच्या खांद्यावरच शोभून दिसते. दुसऱ्या कुणाच्याही खांद्यावर ती शोभत नसल्याचे सांगत पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानांचे स्वागत केलं. कात्रज परिसरातील काकासाहेब कुस्ती संकुलात यंदाचा महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर आणि उप महाराष्ट्र केसरी शैलेश काळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनतर केलेल्या जाहीर भाषणात ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, एक एक पैलवान तयार करताना किती कष्ट घ्यावे लागतात, किती खर्च करावा लागतो याची मला जाणीव आहे. पराभव झाल्याने पैलवानांनी खचून जाऊ नये आणि यश मिळालं म्हणून हुरळूनही जाऊ नये. खेळात जय पराजय होत असतात, त्यात खिलाडू वृत्ती जपायची असते. यशात सातत्य ठेवायचं असतं.

राज्यातील खेळ अधिक लोकप्रिय होण्यासाठी काय करता येईल, यासाठी मी क्रीडामंत्री सुनील केदार आणि क्रीडाराज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत बैठक घेतली. पालकांनाही वाटले पाहिजे की माझा मुलगा, मुलगी जरी अभ्यासात कमकुवत असला तरी एखाद्या खेळात निष्णात असावा. एखाद्या खेळात त्याने यश संपादन करावं. हे यश संपादन केल्यानंतर खेळातून बाहेर पडल्यानंतर त्याला एखादी नोकरी मिळावी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा महाआघाडीच्या सरकारचा प्रयत्न असेल. त्यामुळे खेळाडूंनी काळजी करू नये.


पवार मंडळी कुस्तीचं मैदानही गाजवतात हे आजच समजलं -
पवार मंडळी फक्त राजकिय मैदान गाजवतात असा माझा आजवर समज होता. पण पवार मंडळी कुस्तीचं मैदानही गाजवतात हे मला आज समजलं. म्हणजे इथेही पवार काही कमी नाहीत हे पुणेकरांनी लक्षात ठेवावे, असे गमतीने म्हणताच एकच हास्याची लाट उठली.

Shivbhojan Yojna | पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेचं उद्घाटन | ABP Majha