Maharashtra heat wave : नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
राज्यात पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने दर्शवला आहे.
Maharashtra heat wave : राज्यात मागील काही दिवसांपासून अनेक शहरांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. मात्र पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने दर्शवला आहे. विदर्भात येलो अलर्टदेखील जारी केला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस उष्णतेपासून बचाव करण्याचं आवाहन वेधशाळेकडून करण्यात आला आहे. सकाळी 11 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वाधिक तापमान असणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
देशातील हवामानात सतत चढ-उतार होताना दिसत आहे. कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचं तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवलं जाऊ शकतं. महाराष्ट्रातही वाढत्या उष्णतेमुळं नागरिक बेजार झाले आहेत. रखरखत्या उन्हामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. राज्यात कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. हवामान खात्यानं देशातील बहुतांश शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका आणि भरपूर पाणी पित रहा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
पुढील तीन दिवस वातावरण कसं असेल?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उद्या (2 जून) मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यासोबत मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 4 जूनला कोकण, गोवा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पाऊस येण्याची शक्यता आहे आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारादेखील पडण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 5 जूनला कोकण, गोवा, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह पाऊस येण्याचा अंदाज आहे.
पुण्यातील स्थिती काय असेल?
पुण्यात पुढील तीन दिवस हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे आणि दुपारनंतर काही प्रमाणात पाऊस येण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना आता दमट वातावरणाचा सामना करावा लागणार आहे.
उन्हात जाताना कोणती काळजी घ्याल?
- फार महत्वाचं काम नसल्यास घराबाहेर पडू नये.
- कापडी स्कार्फ बांधूनच घराच्या बाहेर पडा.
- पुरेसं पाणी पीत रहा.
- सुती कपड्यांचा वापर करा
- उन्हातून घरी आल्यावर लगेच पाणी पिऊ नका.
- उपाशीपोटी घराबाहेर पडू नका.
- तळलेले आणि तूपकट पदार्थ टाळा.
- गॉगल, टोपी, रुमाल, छत्री यांचा वापर करा.