Bhagat Singh Koshyari : विभिन्न विचारांच्या दोन व्यक्तींनी एकाचवेळी एकाच ठिकाणी आयुर्वेदिक उपचार घेतले आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं, अशी मिश्किल टिप्पणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केली. पुण्यातील कार्ला येथील पद्मश्री श्रीगुरु डॉ.बालाजी तांबे स्मारकाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यपाल यांनी मिश्किल टिप्पणी केली. ऋषीमुनींनी दिलेल्या आयुर्वेदातील ज्ञानाला संशोधनाद्वारे अधिक पुढे नेल्यास आयुर्वेद आणि आधुनिक उपचार पद्धतीत संतुलन स्थापित होत मानवजातीचे कल्याण साधता येईल, असे कोश्यारी म्हणाले. मावळ तालुक्यात कार्ला येथील आत्मसंतुलन व्हिलेज परिसरात आयोजित कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, बालाजी तांबे फाउंडेशनच्या अध्यक्षा वीणा तांबे, सुनिल तांबे, संजय तांबे, डॉ.मालविका तांबे आदी उपस्थित होते.
पुण्यातील लोणावळालगत दिवंगत बालाजी तांबे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी एक प्रसंग सांगितला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे या विभिन्न विचारांच्या व्यक्तींनी एकाचवेळी तांबे यांच्याकडे उपचार घेतले होते. हाच धागा धरून राज्यपालांनी विभिन्न विचाराच्या महाविकास आघाडीला टोला लगावला. याला तटकरे मागून प्रतिउत्तर देत होते, तेव्हा आमच्या या आघाडीला शुभेच्छा आहेत, अशी मिश्किल टिप्पणी राज्यपालांनी केली. या समाजात अनेक प्रकारचे आजार पसरतात, याबाबत राजकीय नेते तुम्हाला अधिकच सांगू शकतात, असं म्हणत बिघडलेल्या राजकीय परिस्थितीवर राज्यपालांनी भाष्य केलं.
डॉ.बालाजी तांबे यांनी मानवजातीसाठी केलेले कार्य पुढे सुरू रहावे अशी अपेक्षा करून राज्यपाल म्हणाले, 'योग, ध्यान आदीसंबंधी भारतीय ज्ञान जाणून घेत आचरणात आणण्याचा प्रयत्न केल्यास मानवजीवन सुखकारक होईल. आपल्या देशाचे हे भाग्य आहे की नवा आजार समोर येताच त्यावर उपचार पद्धती विकसित झाली आहे. धन्वंतरीपासून सुरू झालेली परंपरा आजही कायम आहे. ' डॉ.बालाजी तांबे यांनी ही प्राचीन शिकवण अनुसरत आयुर्वेदाचे महत्व जगभरात पोहोचविले. या कार्याबद्दल समाज नेहमी त्यांचा ऋणी राहील. आयुर्वेद शरीरासोबत माणसाचा मानसिक आणि आध्यात्मिक विकास साधणारा असल्याचा संदेश डॉ.तांबे यांनी आपल्याला दिला आहे, असेही राज्यपाल म्हणाले.
आणखी वाचा :