Maharashtra Assembly Session Aaditya Thackeray : विधिमंडळाचं यंदाचं अधिवेशन सर्वसामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आमदारांनी घातलेल्या गोंधळामुळे गाजले आहे. आमदारांनी एकमेकांना केलेली धक्काबुक्की यामुळेच अधिवेशनाची अधिक चर्चा झाली आहे. खरंतर कालच्या गोंधळानंतर आज सुधारणा होईल अशी अपेक्षा होती परंतु आजही पायऱ्यावर आंदोलन बघायला मिळालं.
'युवराजांची कायमच दिशा चुकली', असं पोस्टर हातात घेऊन शिंदे गटातील (Shinde Group) आमदारांनी पुन्हा एकदा विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं. या पोस्टरवर आदित्य ठाकरे यांचा घोड्यावर उलट्या दिशेने बसलेला फोटोही आहे. एकीकडे हिंदुत्व आणि दुसऱ्या दिशेने महाविकास आघाडी दाखवण्यात आलं आहे. तर आदित्य हे हिंदुत्वाकडे पाठकरुन बसलेले आहेत आणि ते महाविकास आघाडीच्या दिशेने बोट दाखवताना दिसत आहेत. अशा पद्धतीचे बॅनर झळकावत शिंदे गटातील आमदारांनी आज आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला.
आदित्य ठाकरे यांच्या विरोधातील आंदोलन झाल्यानंतर साडेअकराच्या सुमारास विरोधकही आक्रमक झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा पायऱ्यावर येऊन घोषणाबाजी करायला सुरुवात केली. 50 खोके एकदम ओके', 'ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है' अशा घोषणा देत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला.
शिंदे गटातील आमदार जे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत ते कधीकाळी त्यांचे साथीदार होते. दोघांनीही एकत्र काम केलं आहे. पण आता दोन्ही गट एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. एकमेकांवर वैयक्तिक हल्ला करण्यापेक्षा आंदोलन करणाऱ्या या नेत्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न विधिमंडळाच्या पायऱ्यावर मांडले असते तर त्यांची निवडही सार्थकी लागली असती आणि लोकांचेही प्रश्न सुटले असते. पण गटातटाच्या या राजकारणात लोकांच्या प्रश्नाचं गांभीर्य कोण ठेवेल? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
अजित पवार काय म्हणाले...
या गोंधळाच्या काहीच मिनिटं आधी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, 50 खोके, एकदम ओक्के ही घोषणा त्यांना एवढी जिव्हारी लागली की ते नाराज झालेले दिसत आहेत. यामुळंच त्यांच्यातील काही आमदार आज विधिमंडळातील पायऱ्यांवर आलेत. त्यांच्या या वागण्यानं हे निष्पन्न झालं आहे की, त्यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.
संबंधित बातम्या :