Pune : पुणे जिल्ह्यात रेशीम कोषाच्या उत्पादनात (Silk Production) चांगली वाढ झाली आहे. जिल्ह्यात 2022-23  या वर्षात दोन लाख  किलोपेक्षा अधिक रेशीम कोषाचं वार्षिक उत्पादन झाल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी संजय फुले यांनी दिली आहे. यावर्षी  तुती लागवडीसाठी 250 एकर लक्षांकापैकी 241 एकर क्षेत्रावर 226 शेतकऱ्यांनी तुतीची लागवड केली आहे. चालू वर्षात 3 लाख 9 हजार 400 अंडीपुंजाच्या कीटक संगोपनापासून 2 लाख 18 हजार 414 किलोग्राम कोषांचे उत्पादन झालं आहे.


बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रेशीम संचालनालय यांच्याकडून कोषांची खरेदी  


पुणे जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अंडीपुंजाच्या अनुदानापोटी 13 लाख 33 हजार 913 रुपये मंजूर झाले आहेत. लाभार्थ्यांना रक्कम वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात 175 अल्पभूधाक शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. ही योजना तीन वर्षाच्या कालावधीसाठी असून विभागून एकरी रुपये 3 लाख 42 हजार 900  रुपये अनुदान देण्यात येते. महाराष्ट्रात पहिल्यांदाच बारामतीत कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रेशीम संचालनालय यांचे समन्वयाने ईनाम पद्धतीने कोषांची खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. 51  हजार 626 किलोग्राम कोषांची खरेदी या बाजारात झाली आहे. याची किंमत 2 कोटी 96  लाख 96 हजार 490 रुपये आहे.  भारतात ई-नाम पद्धतीने कोषांची खरेदी करणारा पुणे हा पहिलाच जिल्हा आहे. 


रेशीम पिकाचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न 


जिल्हा वार्षिक योजनेतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती येथे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं रॉ सिल्क सेंटरसाठी 5  लाख 39 हजार रुपयांचा निधी मिळाला असून त्यातून यंत्र उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान, खेड तालुक्यातील दौंदे इथं खासगी स्तरावर बाल किटक संगोपन केंद्र (चॉकी) असून त्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन अवस्था पूर्ण झालेले रेशीम किटकांचा (अळ्यांचा) पूरवठा केला जातो. त्यामुळं शेतकऱ्यांच्या कोष उत्पादनात वाढ झाली आहे. तसेच वार्षिक रेशीम पिकांची संख्या वाढण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे रेशीम अळ्यावरती येणाऱ्या रोगामुळे होणारे नुकसानीस आळा बसला आहे. जिल्ह्याबाहेरुन देखील शेतकरी बाल किटक संगोपन केंद्रातून अळ्या खरेदी करतात. पुणे जिल्ह्यात चालू वर्षी 1 लाख 67 हजार 200 अंडी पुज्यांची चॉकी वाटप करण्यात आली आहेत. 


शासनाने सन 2023-24 साठी 250 एकर तुती लागवडीचे लक्षांक दिलेला आहे. आजअखेर 840 शेतकऱ्यांनी 849 एकर क्षेत्राकरीता नाव नोंदणी केली आहे. चालू वर्षापासून सिल्क समग्र-2 योजनेतून शेतकऱ्यांकरीता तुती लागवड, किटक संगोपन गृह बांधणी, रेशीम धागा निर्मिती करता आणि बाल किटक संगोपन केंद्र उभारणी याकरता अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाचा हिस्सा असणार आहे. 


तुतीच्या पाल्यापासून 'ग्रीन टी' ची निर्मीती 


रेशीम शेती उद्योगामध्ये कोषापासून वस्त्रनिर्मितीपर्यंत आर्थिक लाभ मिळतोच, परंतू याशिवाय तुती पाल्यापासून 'ग्रीन टी' तयार केला जातो. हा मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात गुणकारी ठरत आहे. प्युपापासून (सुरवंटापासून)  मत्स्यखाद्य आणि तेल निर्मिती होते. तसेच तुतीच्या फळांपासून उच्च दर्जाची वाईन निर्मिती केली जाते. याशिवाय अलीकडच्या काळात रेशीममध्ये असणारे सेरीसिन या रसायनांपासून विविध औषधे निर्मिती केली जाते. नुकत्याच झालेल्या संशोधनातून यापासून बनवलेले औषध कर्करोगावर परिणामकारक असल्याचे समोर आले आहे. तसेच कोषापासून आकर्षक हार, गुच्छ, लहान मुलांची खेळणीदेखील तयार केली जातात.


महत्त्वाच्या बातम्या:


Kolhapur News : नाबार्डचा पुढाकार; कोल्हापुरात मध, रेशीम, शेळीपालनासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना