Priya Berde On BJP Entry: अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून (Priya Berde On BJP Entry) भाजपत प्रवेश केला. मात्र हा प्रवेश कोणत्या कारणाने केला? यावर त्यांनी थेट स्पष्टीकरण दिलं आहे. पक्षांतरानंतर पहिल्यांदाच त्यांनी भाजपात केलेल्या प्रवेशाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना मला कामाच्या खूपच मर्यादा होत्या. भाजपमध्ये काम करण्याचा स्पेस मिळावा म्हणून मी भाजप मध्ये प्रवेश केला, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी कलाकारांबाबत बोलताना त्यांना अश्रु अनावर झाले होते. 


...  म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला- प्रिया बेर्डे


प्रिया बेर्डे म्हणाल्या,राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना मला कामाच्या खूपच मर्यादा होत्या. माझं काम सर्वत्र मर्यादित आहे. भाजपा नेते कोणत्याही कामात लगेचच मदत करतात.  भाजपमध्ये काम करण्याचा स्पेस मिळावा म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला.  मला प्रसिद्ध व्हायची इच्छा नाही. आतापर्यंत सांस्कृतिक विभाग नेहमीच दुर्लक्षित होता. या विभागाला नेहमीच प्रचारापुरतेच गृहित धरले जायचे. पण आता तसं होणार नसून प्रत्येक कलाकराला न्याय मिळेल, असं त्या म्हणाल्या. 


अश्रु अनावर....


अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी यांनी डान्सर गौतमी पाटील हिला खडेबोल सुनावल्यानंतर मराठी सिनेसृष्टीतील काही किस्से सांगताना त्यांना अश्रुंचा बांध फुटला होता. तामाशा कलावंतांची परिस्थिती पाहून मला फार वाईट वाटतं. या कलाकारांना कोरोनाच्या काळात अनेकांच्या घरी कामं करावी लागली, असं म्हणत त्यांना अश्रु अनावर झाले होते. त्या म्हणाल्या की,  मागील 40 वर्षांपासून मी मराठी चित्रपटसृष्टी काम करत आहे. माझ्या वयाच्या 12 व्या वर्षापासून मी अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी सुरूवात केली होती. मनोरंजन क्षेत्रासाठी काम करणारी कुठलीही संस्था नाही. कोरोना महामारीनंतर सर्वच जग मोठ्या उमेदीने उंच भरारी घेत आहे. इंडस्ट्रीमध्ये नेहमीच कलाकार आणि इतर लोकांमध्ये भेदभाव केला होतो. तमाशा कलावंतांना अनेकांच्या घरी कामं करावी लागली असं त्या म्हणाल्या. 


परिस्थिती बदलताना दिसत नाही! 


राज्यातील नाट्यगृहाची दुरावस्था सध्या सर्वांनाच ठाऊक आहे. अनेकदा अनेक कलाकारांनी नाट्यगृहाची घाणेरडी स्थिती  दाखवली आहे. राज्यातील नाट्यगृहाची स्थिती अधिकच चांगली व्हावी यासाठी खात्याची मंत्र्यांनी 25 कोटी रुपयांचा निधी देखील दिला आहे. मात्र परिस्थिती बदलताना दिसत नाही आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.