पुणे : 14 एप्रिल ही तारीख जशी जवळ येते आहे तसं पंतप्रधान आता लॉकडाऊन संदर्भात कोणता निर्णय घेतात याची उत्कंठाही संपूर्ण देशाला लागली आहे. पण लॉकडाऊनच्या उठवण्याच्या किंवा वाढवण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय झाला तरीही सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात पुण्यातील निवारा केंद्रांमध्ये राहणाऱ्या कामगार, मजूर यांची घराकडे जाणारी वाट इतकी सोपी नाही.


"गेल्या 17-18 दिवसांपासून आम्ही काही केलेलं नाही. आमच्याजवळ एक पैसा उरलेला नाही. जरी लॉकडाऊन संपला तरीही काम मिळेल की नाही याचा भरवसा नाही. मग मनातून कितीही वाटलं तरी आम्ही घरी जाणार कसं?" मूळचे धुळे जिल्ह्यातले कामगार प्रमोद पाटील यांनी हा प्रश्न विचारला.


24 तारखेपासून संपूर्ण देश क्वॉरन्टाईनमध्ये गेला. पण त्याआधी 22 तारखेला रेल्वे बंद झाल्या. त्यामुळे महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागांमधून पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्यात असलेले मजूर, कामगार इथेच अडकले. गावाकडे कुटुंबासोबत परत जाता येईना, पुण्यात राहण्यासाठी निवारा आणि अन्न याची सोय होईना अशी त्यांची अवस्था झाली. अशा जवळपास 1303 कामगारांची पुणे पालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून विविध ठिकाणी सोय करण्यात आली आहे. निवारा केंद्र, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये हे कामगार सध्या राहत आहेत. पुण्यातील नारायण पेठेतील पालिकेतल्या गोगटे प्रशालेमधेही 81 कामगार सध्या राहत आहेत. त्यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला.


स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्रशासनाकडून या शाळेमध्ये त्यांच्या जेवण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इथे तात्पुरता आसरा जरी मिळाला असला तरीही या कामगारांच्या मनातलं चिंतेचं सावट मात्र कायम आहे.



"मी सोलापूर जिल्ह्यातला आहे. ठेकेदाराकडे काम करायचो. लॉकडाऊनच्या आठवडाभर आधी तो पळून गेला. त्याच्याकडून दोन आठवड्यांचे पैसे घ्यायचे आहेत. लॉकडाऊननंतर खिशात दमडी नसताना वणवण फिरलो. कुणी काही खायला दिलं तर ठिक नाहीतर नदीपत्रात तसाच बसून राहिलो. मग पोलिसांनी इथे आणलं. असं वाटतं घरी जावं... तिथे बायको, मुलगी आहे. त्या पण कामावर जायच्या. आता त्यांचंही काम बंद आहे. घर कसं चालत असेल माहिती नाही. पण मी ते विचारत नाही. घरी कितीही हाल झाले तरीही चालतील पण घरी राहावं असं वाटतंय," सोलापूर जिल्ह्यातील दादा लक्ष्मण चंदनशिवे यांनी ही व्यथा बोलून दाखवली.


विदर्भातील एका खाजगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाची वेगळीच गोष्ट आहे. कंपनीच्या कामाने तो पुण्यात आला. 22 तारखेचं रेल्वेचं परतीचं आरक्षण होतं. पण त्यादिवसापासून रेल्वेच रद्द झाल्या. त्यामुळे तो इथे अडकून पडला.


"काही दिवस मी हॉटेलमध्ये राहिलो. पण मग जवळचे पैसे संपले. मग रस्त्यावर आलो. हा निवारा केंद्र आहे असं समजलं मग आता इथे राहतोय. पण घरी सांगितलं नाही की मी निवारा केंद्रामध्ये राहतोय. नाहीतर ते अजून काळजी करतील. माझी आई गावी एकटीच आहे. कधी तिच्याजवळ जातो असं झालंय," असं या मुलाने बोलताना सांगितलं.


पुणे शहरात 24 हून अधिक ठिकाणी अशा कामगारांची सोय करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीपर्यंत त्यांना हा निवारा देण्यात आला आहे. पण लॉकडाऊननंतर काय हा प्रश्न या कामगारांच्यासमोर आ वासून उभा आहे.