पुणे : पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाबाधित मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी (8 एप्रिल) रात्री उशिरा पुण्यात दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाबाधित मृतांचा आकडा 10 वर पोहचला आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 18 झाली आहे.


पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही चिंताजनक आहे. यामध्ये ससून रुग्णालयात 11, डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये 1, नोबल हॉस्पिटलमध्ये 2,इनामदार हॉस्पिटलमध्ये 1,औंध सिव्हिल रुग्णालयात 1, डीएमएच रुग्णालयात 1,सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 1 अशा एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे उपाययोजना करण्यात येत असून महानगरपालिका क्षेत्रातील काही भागात संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच पुणे महानगरपालिकेचे 25 दवाखाने सकाळी 8.00 वाजल्यापासून रात्री 8.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.

coronavirus | मृत्यू झालेल्या दोन कोरोना बाधितांकडे कुटुंबियांची पाठ, नायडू रूग्णालयाची रूग्ण ठेवण्याची क्षमता संपली


सोशल डिस्टन्स पाळा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढू नये म्हणून प्रशासनाकडून वारंवार सोशल डिस्टन्स पाळण्यास सांगितलं जात आहे. मात्र, तरीही लोक विनाकारण रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. भाजी मंडई असेल किंवा अन्य ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळण्यास सांगितले जात आहे. मात्र, काही लोक अद्यापही याचे अनुकरण करताना दिसत नाही. त्यामुळे परिणामी आम्हाला कठोर व्हावं लागेल, असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचंही आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

राज्यात तिसरी स्टेज नाही

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची तिसरी स्टेज राज्यात सुरु झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. राज्यात जरी वेगाने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी ही तिसरी स्टेज नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. पहिल्या स्टेजमध्ये बाहेरुन आलेले लोक कोरोना पॉझिटिव्ह असतात. तर, दुसऱ्या स्टेजमध्ये बाहेरुन आलेल्या लोकांमुळे स्थानिकांना याची लागण होण्यास सुरुवात होते. तर, तिसऱ्या स्टेजमध्ये कोरोनाची लागण कम्युनिटीमध्ये पसरते, असे ह्या संसर्गाचे प्रकार समजले जातात.