Landslide News : इर्शाळवाडीत झालेल्या (Khalapur Irshalwadi Landslide) भूस्खलनामुळे राज्य हादरलं. पश्चिम घाटातील पर्वतरांगांमध्ये दर काही वर्षांनी भूस्खलनाच्या घटना घडत असतात. त्यामुळे पावासाळा आला की याच परिसरातील नागरिकांना भूस्खलनामुळे धोका निर्माण होतो. इर्शाळवाडीत घटनेनंतर पसारवाडी गावातील नागरिकांना चांगलाच धक्का बसला आहे. पुण्यातील माळीणला खेटून असणारी पसारवाडीने कालची रात्र अक्षरशः जागून काढली आहे.
इर्शाळवाडीच्या दुर्घनेनंतर हे अख्ख गाव भीतीच्या सावटाखाली आलं. माळीणच्या दुर्घनेनंतरच्या अहवालात पसारवाडी धोकादायक असल्याचं शासनाने जाहीर केलं होतं. आपल्यावर अशी वेळ येऊ नये, म्हणून इथल्या ग्रामस्थांनी पुनर्वसन करण्याची तयारी दर्शवली. ग्रामस्थांनी स्वतःची अडीच एकर जागा पुनर्वसनासाठी देऊ ही केली. मात्र गेली नऊ वर्ष इथलं पुनर्वसन रखंडलंय, परिणामी दोनशे लोकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागतंय. माळीण आणि इर्शाळवाडी सारखी वेळ आमच्यावर येण्याची वाट सरकार पाहतंय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
नागरिक धास्तावले...
2014 मध्ये माळीण गावात भूस्खलन झालं होतं. त्यानंतर ते गाव पुनर्वसन करण्यात आलं. 2014 मध्ये माळीणकरांवर मोठं संकट आलं होतं. अनेक संसार उद्ध्वस्त झाले होते आणि शंभरहून जास्त लोकांचा जीव गेला होता. त्यावेळी या गावातील एकमेव शाळा या दुर्घटनेत बचावली होती. त्यानंतर तळीयेमध्येदेखील अशीच घटना घडली होती. दोन्ही गावांचं पुनर्वसन करण्यात आलं मात्र ज्या गावांना भूस्खलनाची भीती आहे त्या गावातील नागरिकांना अशा घटनांनंतर धास्ती बसते. त्यामुळे नागरिक वारंवार सरकारला पुनर्वसनाची मागणी करत आहेत.
पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण
मंगळवारपासून घाटमाथ्यावरही पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण आणि 84 पूरप्रवण गावे आहेत. दरडप्रवण गावात दरडी कोसळण्याची शक्यता तसेच पूरप्रवण भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. आपल्या भागात घटना घडल्यास तात्काळ नियंत्रण कक्षास कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केलं आहे .
मान्सूनच्या काळात विशेषत: सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता वाहतूकीचे योग्य नियोजन करावे. भोर, वेल्हा, मुळशी आणि मावळ या भागातील यंत्रणांनी सतर्क राहावे. धरणातील पाण्याची पातळी वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. त्यामुळे नदी परिसरात पूरप्रवण गावातील नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना द्याव्यात असंही सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा-