पुणे : ड्रग माफिया ललित पाटीलला (Lalit Patil Drug Case) मदत करण्यात येरवडा कारागृह प्रशासन देखील सहभागी असल्याचं समोर आलंय. कारण येरवडा कारागृहाच्या चीफ मेडिकल ऑफिसरने लिहलेलं एक पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. 3 जून 2023 चं हे पत्र ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना उद्देशून लिहण्यात आलं आहे . या पत्रात येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधीक्षक ललित पाटीलला उपचारांसाठी ससून रुग्णालयात भरती करून घेण्याची आणि किमान 15 दिवस त्याला तिथंच ठेवण्याची विनंती करत आहे. त्यामुळे आता येरवडा कारागृह प्रशासनाची चौकशी होण्याची गरज आहे.
ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पुन्हा येरवडा कारागृहात नेण्यासाठी एस्कॉर्ट उपलब्ध नसल्यानं ललित पाटीलला ससून रुग्णालयातच 15 दिवस ठेऊन घेण्यात यावं, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. या पत्रावर ससूनच्या चीफ मेडिकल ऑफिसरची आणि कारागृहातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. त्यामुळं ललित पाटीलला फक्त ससूनमधील डॉक्टर आणि पुणे पोलीस यांचीच मदत मिळत होती, असं नाही तर येरवडा कारागृहातील अधिकारीही त्याच्या पाठीशी होते हे या पत्रांतून सिद्ध होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जून महिन्यात ससून रुग्णालयात दाखल झालेला ललित पाटील पुढे तब्ब्ल पाच महिने, म्हणजे तो रुग्णालयातून पसार होईपर्यंत ससून रुग्णालयातच ठाण मांडून होता.
कालच दोन पोलीस बडतर्फ
कालच (21 नोव्हेंबर) ललित पाटील प्रकरणात पुणे पोलीस दलातील दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. नाथा काळे आणि अमित जाधव असं या दोघांचं नाव असून हे दोघेही सध्या अटकेत आहेत. ललित पाटील याला ससुन रुग्णालयातून (Sasoon Hospital Drug Case) पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप या दोघांवर असून त्यांच्या बडतर्फीचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी काढले आहेत. पुण्यातील ड्रग माफीया ललित पाटील ससुन रुग्णालयातून 1 ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. तेव्हा नाथा काळे आणि अमित जाधव हे दोन पोलीस कॉन्स्टेबल ससुन रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या 16 नंबर वॉर्ड बाहेर पहारा देत होते. कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्या बडतर्फीचे आदेश काढण्यात आले आहेत.
पुणे पोलिसांकडून ललित पाटीलला आणखी आठ दिवसांची पोलीस कोठडी
काल (21 नोव्हेंबर) ललित पाटील प्रकरणात तपास केल्यानंतर गोपनीय अहवाल पुणे पोलिसांकडून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींचा मेफेड्रॉन विक्रिची साखळी चालवण्यासाठी कसा संबंध येत होता हे सिद्ध करण्यासाठी पुणे पोलिसांकडून ललित पाटीलला आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. ललित पाटीलसह त्याच्या 12 साथीदारांना त्यांची पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयात हजर करण्यात आल होतं. ललित पाटीलसह आठ आरोपींना 24 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी तर इतर पाच आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
इतर महत्वाची बातमी-
Lalit Patil : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, अटकेत असलेल्या दोन्ही पोलिसांच्या बडतर्फीचे आदेश