पुणे : ललित पाटील (Lalit Patil)  ड्रग्ज प्रकरणात (Drug Case)  रोज नवे खुलासे समोर येत आहे. ललित पाटील पलायन प्रकरणात अटक करण्यात आलेला येरवडा कारागृहातील (Yerwada Jail)  समुपदेशक सुधाकर सखाराम इंगळे याच्याबाबत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.  येरवडा कारागृहातील समुपदेशक सुधाकर इंगळेनी ललित पाटीलला पळून जाण्यासाठी  मदत केल्याचं समोर आले आहे.  इंगळेची प्रतिनियुक्ती रद्द करा,अशा आशयाचे पत्र येरवडा कारागृहाने जिल्हा रुग्णालयाला लिहिले आहे.   


ललित पाटील हा कारागृहात बसून ड्रग्स रॅकेट चालवत होता. सप्टेंबर 2022 मध्ये येरवडा कारागृह अधीक्षक यांनी इंगळे यांच्या बदलीचे आदेश काढले होते. नियुक्ती रद्द होऊन सुद्धा पुनर्नियुक्ती कोण करत होतं? असा सवाल  या निमित्ताने उपस्थित होत आहे. डिसेंबर महिन्यात पुन्हा हाच आदेश तत्कालीन अधीक्षक यांनी जाहीर केला होता. इंगळे यांच्या जागी एक नवीन समुपदेशक निवडा असे पत्र येरवडा कारागृहाने जिल्हा रुग्णालयाला दिले होते.


ललित पाटीलला पळून जाण्यासाठी इंगळेने केली होती मदत


 सखाराम  इंगळे 2008 पासून सतत पुनार्नियुक्तीने जिल्हा रुग्णालयात समुपदेशक म्हणून काम करत होता. येरवडा कारागृहाने पुन्हा जिल्हा रुग्णालयाला पत्र लिहून इंगळे याची नियुक्ती रद्द करावी अशी मागणी केली आहे . ललित पाटील हा ससूनमध्ये असताना इंगळे त्याच्या संपर्कात आला होता आणि त्याने ललित याला पळून लावण्यात मदत केल्याचे देखील समोर आले आहे.


ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील 16 जणांची चौकशी 


ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांकडून (Pune Police)  आत्तापर्यंत ससून रुग्णालयातील 16 जणांची चौकशी करण्यात आली होती. ससून रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफची याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. ज्या डॉक्टरांनी ललित पाटील यांच्यावर उपचार केले त्यांची सखोल चौकशी आणि जबाब पोलिसांनी  नोंदवून घेतले आहेत. ललित पाटील हा ससून रुग्णालयातील 16 नंबर वॉर्ड मध्ये दाखल होता. या वार्डमध्ये कार्यरत असणाऱ्या इतर स्टाफची सुद्धा पोलिसांनी  चौकशी केली. ललित पाटील पलायन प्रकरणी ससूनमधील काही वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. ससून पाठोपाठ या प्रकरणात कारवाईचा बडगा आता येरवडा कारागृहातील प्रशासनावर देखील उगारण्यात आला आहे.


हे ही वाचा :


Lalit Patil Drug Case : विनय अरहानाच्या फ्लॅटमध्ये ललित पाटीलचा मुक्काम; जेल ते फ्लॅट... व्हाया ससून रुग्णालय, ललित पाटीलला पाठिंबा कोणाचा?