Pune Crime News : पुण्यातील कोयता गॅंगची दहशत (Pune crime) वाढताना दिसत आहे. या गॅंगने पुणे जिल्ह्यातील वेळू ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम पेट्रोल (Crime) पंपावर दरोडा टाकला. चोरांनी कोयत्याने मारहाण करुन 22 हजार रुपयांची रोख रक्कम लुटली आहे. या सगळ्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत. शुक्रवारी (23 डिसेंबर) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाच अज्ञात व्यक्ती हातात दोन ते अडीच फूट लांबीचे धारदार कोयते घेऊन दोन काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरुन आले. त्यांनी सिक्युरिटी गार्डच्या हाताला पकडून कार्यालयात आणून रोख रकमेची मागणी केली. त्यांनी शिवीगाळ करत तीन कामगारांना आणि सुरक्षारक्षकाला कोयत्याने मारहाण केली. पेट्रोल पंपाच्या मालकाने या प्रकाराची पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भोर पोलीस ठाण्यात अज्ञात पाच आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 


मारहाण करुन अज्ञात पसार


शहरात सध्या कोयता गॅंगची दहशत वाढत आहे. शहरातील अनेक भागात या गॅंगने धुमाकूळ घातला आहे. त्यांनी आता पेट्रोल पंपावर दरोडा टाकत रोकड लुटली आहे. त्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करुन अज्ञातांनी पळ काढला आहे. कोयता गॅंगचा सध्या पोलीस शोध घेत आहे. 


हडपसर परिसरातही धुमाकूळ


या कोयत्या गॅंगमुळे हडपसर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक व्यापारी आणि लहान भाजी विक्रेते या गँगमुळे धास्तावले आहेत. या संदर्भात अनेकदा व्यापाऱ्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलीसही त्यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत असतात, मात्र त्यांना पोलिसांचीही भीती उरली नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या गँगची दहशत वाढत आहे. व्यापारी म्हणतात, या कोयता गँगमुळे आम्हाला त्रास होत आहे, शिवाय त्यांच्या दहशतीमुळे लहान व्यापाऱ्यांवर आणि ग्राहकांवरदेखील मोठा परिणाम होत आहे. अनेक लोक या गँगमुळे धास्तावले आहे. लहान मुलांनाही या गँगकडून धमक्या येत आहेत. यामुळे मुलांसह पालकही धास्तावले आहेत. त्यामुळे या गँगचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी संघटनेकडून मागणी केली जात आहे. 


कोयता गँगवर अजित पवारही गरजले


कोयता गॅंगवर ताबडतोब कारवाई करा. त्यांच्यावर मोक्का लावा किंवा त्यांना तडीपार करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना केली आहे. या मागणीनंतर पुणे पोलिसांनी कोयता गँगची धरपकड सुरु केली होती. आता कोयता गॅंगला पकडण्याचं पुणे पोलिसांना मोठं आव्हान आहे.