Pune Crime news : पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्स (cyber crime) असलेल्या चंदुकाका सराफचे डायरेक्टर किशोर कुमार शहा बोलतोय, असे सांगून बॅंक मॅनेजरला 19 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. बँकेला बनावट ई-मेल पाठवत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी बंडगार्डन (pune police) पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील ट्रेझरी शाखेत शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्स असलेल्या चंदुकाका सराफ अँड सन्स या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर किशोर शहा बोलत असल्याचा फोन करुन एक बनावट मेल पाठवण्यात आला. तसेच स्टेट बँकेच्या मॅनेजरला मी तुमचा महत्वाचा कस्टमर आहे, असं सांगितलं. त्यानंतर नातेवाईक आजारी आहे असं कारण दिलं. मॅनेजरला तातडीने पैसे पाठवण्यास सांगितलं. हे सगळं सांगत त्यांनी बॅंकेच्या मॅनेजरचा विश्वास संपादन केला आणि सायबर चोरट्यांनी गंडा घातला.


दोन वेगवेगळ्या अकाऊंटवर पाठवले पैसे


या सायबर चोरांनी बॅंक मॅनेजरचा विश्वास संपादन केला आणि त्यांना शहा यांचं नाव सांगून सायबर चोरट्यांनी 2 वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानंतर हा सगळा प्रकार बनावट असल्याचं बॅंक मॅनेजरच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी देखील शहांसोबत चौकशी केली. लगेच बॅंक मॅनेजरने पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या सायबर चोराचा शोध घेत आहेत.


आदर पुनावाला यांचं नाव वापरुनही झाली होती फसवणूक


यापूर्वी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अदार पूनावाला यांचं नाव वापरुन फसवणूक करण्यात आली होती. एका अज्ञात सायबर फसवणूक करणार्‍यांनी 1 कोटी रुपयांचां गंडा घातला होता. त्यांच्या एका संचालकाला व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून अनेक ठिकाणी पैसे पाठवण्याची मागणी केली आहे. त्यानुसार त्या संचालकांनी पैसे पाठवले आहे. मात्र संपूर्ण प्रकरण पुढे आल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली होती. या आरोपींना पुणे पोलिसांनी बिहारमधून अटक केली होती. सागर कित्तूर असं त्यांच्या कंपनीच्या फायनान्स मॅनेजरचं नाव आहे. त्यांना एक व्हॉट्सअॅप मेसेज आला होता. त्यात आदर पूनावाला यांनी पैसे पाठवण्यासाठी सांगितलं आहे, असं सांगण्यात आलं होतं. त्यासाठी अनेक क्रमांक आणि अकाऊंट नंबर देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी अनेक अकाऊंटमध्ये पैसे पाठवले. कंपनीच्या खात्यातून त्या खात्यांमध्ये 1,01,01,554 रुपये ट्रान्सफर करण्यात आले.  मात्र आदर पूनावाला यांच्याशी बातचीत झाल्यानंतर हा सगळा फ्रॉड असल्याचं समोर आलं होतं.