जेजुरी, पुणे : दुरुस्तीच्या कामासाठी गेली दोन महिने (Jejuri) बंद असलेले जेजुरी येथील खंडोबा मंदिर (Khandoba Temple) आजपासून भाविकांना दर्शनास खुले झाले आहे, अशी माहिती मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी दिली. सध्या पुरातत्त्व विभागातर्फे मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामाची माहिती देण्यासाठी जेजुरी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विश्वस्त मंगेश घोणे, विश्वास पानसे, अॅड. पांडुरंग थोरवे, डॉ. राजेंद्र खेडेकर, अनिल सौंदाडे उपस्थित होते.


दोन महिन्यांपूर्वी मंदिराच्या गाभाऱ्याचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याने दर्शन बंद होते. यामुळे भाविकांची संख्याही मंदावली होती. येथील अर्थचक्रावर याचा परिणाम झाला होता. आता दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर गाभारा दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने मंदिर भाविकांसाठी खुले झाले आहे. भाविकांना रविवारपासून गाभाऱ्याच्या उंबऱ्यातून दर्शन घेता येणार आहे. 


जेजुरीचा ऐतिहासिक खंडोबा गड जतन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे विकास आराखड्याची कामे सुरु होती. त्यामुळे गड बंद ठेवण्यात आला होता. पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या दुरुस्त्या व उपाययोजना करण्यात आल्या. यासाठी सुमारे 107 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झालाय. त्यानुसार गडावर विविध विकासकामे वेगाने करुन आज अखेर गाभारा दर्शनासाठी खुला केला आहे.दरम्यान मुख्य गाभाऱ्याचे काम पूर्ण झालं आहे. एवढे दिवस गडावर येणाऱ्या भाविकांच्या अभिषेक महापूजा या पंचलिंग भुलेश्वर मंदिरात करण्यात येत होती.


जेजुरी जागृत देवस्थान


पुणे जिल्ह्यातील जेजुरी गावात खंडोबाचे देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठारावर खंडोबाचे जुने स्थान होते. परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधले. त्यालाही आता तीन शतकं उलटून गेली आहेत. जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. खंडोबाचे हे जागृत देवस्थान समजले जाते. मराठा, कुणबी, धनगर, आगरी, कोळी आणि इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत आहे. खंडोबाच्या यात्रा आणि जत्रा या चैत्र, पौष तसंच माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे सहा दिवस, वर्षातील सर्व सोमवती अमावस्या आणि आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात.


इतर महत्वाच्या बातम्या : 


मुंबईतील 18 हॉटेल्सवर एफडीएची कारवाई, लाखोंचा दंड वसूल, नियमांचं पालन करण्याची FDA कडून तंबी