Jayant Patil on Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याचे षड्यंत्र सुरू आहे. सरकारला लाडकी खुर्ची महत्वाची आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होतील की नाही हा प्रश्न आहे. असं असताना केवळ चार ते सहा महिन्यांचा विचार सुरु असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. पैशांची गरज कुणाला जास्त आहे हे सरकारने ओळखलं पाहिजे. सरसकट वाटप फक्त निवडणुकीपुरतेच आहे असं सत्ताधारी पक्षाचेच आमदार सांगतात. आम्ही सत्तेत आल्यास ज्यांना गरज आहे त्यांनाच मदत देऊ. त्यांना कदाचित वाढवून देऊ, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 


अजित पवारांना वेगळं लढण्यास सांगितलं जाऊ शकतं 


दरम्यान, महायुतीमधील जागावाटपावरून सुरु असलेल्या वादावरून जयंत पाटील यांनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे. महायुती अडचणीत असल्याने अजित पवार यांनी तात्पुरते वेगळं व्हावं वेगळं लढावं असं कदाचित त्यांना सांगितलं जाऊ शकतं, असा दावा जयंत पाटील यांनी केला. जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार यांना बरोबर घेतल्यानं भाजपची विश्वासार्हता कमी झाली आहे. महाराष्ट्रातच नाही तर, देशात कमी झाली आहे. त्यामुळे ते त्यांना आता तुम्ही थोडसं दुर ऊभं राहा म्हणू शकतील. निवडणुकीनंतर परत आपण जवळ येऊ. आता तुम्ही वेगळी निवडणुक लढवा, निवडणुक झाल्यानंतर आपण परत बरोबर येऊ, असे सांगितले जाऊ शकते, असेही जयंत पाटील म्हणाले. 


आमचा मुख्यमंत्री व्हावा असं लोकांना वाटतं


जयंत पाटील यांनी सांगितले की, शरद पवार यांची भूमिका त्यागाचीच राहिली आहे. महाविकास आघाडी एकसंध राहायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आमचा मुख्यमंत्री व्हावा असं लोकांना वाटतंय हे खरं असल्याचेही ते म्हणाले. 


सांगलीत कोणी कुणाचा कार्यक्रम केला नही


दरम्यान, सांगलीच्या वादावर पांघरुण पडलं असल्याचे पाटील यांनी सांगितले. सांगलीचा विषयावर पांघरून पडलं आहे. ते आता काढण्याची गरज नाही. सांगलीतील दोन्ही तरुण मुलं चांगली आहेत. त्यांच्या वडिलांबरोबर मी काम केलं आहे. मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. त्यावेळी गैरसमज झाले होते. आता दुरुस्ती झाली आहे. सांगलीत कोणी कुणाचा कार्यक्रम केला नाही. परिस्थितीच तशी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या