पुणे : जेम्स लेन आणि त्याच्या पुस्तकाचा वाद गेली दोन दशकं महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण प्रभावित करत आला आहे. एखाद्या पुस्तकाने एवढ्या मोठ्या प्रदेशातील समाजमन ढवळून काढण्याचं दुसरं उदाहरण सापडणार नाही. हे प्रकरण नक्की काय होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रात काय काय घडत गेलं पाहूया.


जेम्स लेन नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला भारतात आला तो महाभारताचा अभ्यास करण्यासाठी. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत लेनने अभ्यासाला सुरुवात केली. संशोधनासाठी भारतात आल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा इथल्या जनमानसावर असलेला प्रभाव त्याला जाणवायला लागला आणि त्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहायचं ठरवलं. 


जून 2003 साली जेम्स लेनचे 'शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' हे पुस्तक ऑक्सफर्ड प्रकाशनाने प्रकाशित केलं. अनंत दारवटकर, प्रफुल्लकुमार तावडे, रा अ कदम यांनी सर्वात आधी या पुस्तकावर आक्षेप घेतला आणि त्यावर बंदी घालण्याची मागणी केली. पश्चिम महाराष्ट्रात याबद्दल विरोधाचे सूर उमटायला लागले. 


या विरोधाची दखल घेत डॉक्टर जयसिंगराव पवार, बाबासाहेब पुरंदरे, गजानन भास्कर मेहेंदळे, निनाद बेडेकर, वसंत मोरे आणि आणखी दोन इतिहास संशोधकांनी हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या ऑक्सफर्ड इंडिया प्रेस या प्रकाशन संस्थेला पत्र लिहिलं आणि पुस्तक मागं घेण्याची मागणी करण्यात आली. 21 नोव्हेंबरला ऑक्सफर्ड प्रेसने या पत्राला उत्तर देत या पुस्तकाबद्दल माफी मागितली. 


या पुस्तकाबद्दल भांडारकर प्राच्यविद्या शिक्षण संस्थेला जबाबदार धरत शिवसेनेकडून भांडारकर संस्थेतील संस्कृतचे अभ्यासक श्रीकांत बहुलकर यांना 22 डिसेंबर 2003 ला काळं फासण्यात आलं. शिवसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख रामभाऊ पारेख यांचा त्यामध्ये पुढाकार होता. मात्र  बहुलकर यांच्यावरील या हल्ल्याचा इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांनी विरोध केला आणि त्याच्या निषेधार्थ ते लिहित असलेल्या शिवचरित्राची 400 पानं स्वतःच्या हाताने नष्ट केली.


त्यानंतर शिवसेनेने भूमिका बदलली आणि त्यावेळी शिवसेनेत असलेले राज ठाकरे स्वतः पुण्यात आले आणि त्यांनी श्रीकांत बहुलकर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि शिवसैनिकांनी त्यांच्यावर केलेल्या हल्ल्याबद्दल माफी मागितली. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस जेम्स लेनने माफीनामा फॅक्स करुन त्याने केलेल्या लिखाणाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. 


यानंतर या प्रकरणात संभाजी ब्रिगेडची एन्ट्री झाली. 5 जानेवारी 2004 रोजी संभाजी ब्रिगेडकडून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला करुन संस्थेची तोडफोड करण्यात आली. पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्येला 72 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.


इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मुद्द्याचं राजकारण करण्यास सुरुवात झाली. त्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून हा प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवण्यात आला. तत्कलीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी जाहीर सभांमधून हा मुद्दा उचलून धरला. 


या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 71 आमदार निवडून आले आणि हा पक्ष महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष बनला. ही राष्ट्रवादीची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्यानंतर देखील भांडारकर आणि जेम्स लेन हे मुद्दे महाराष्ट्राच्या राजकारणात अधून मधून येत राहिले. 


2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने 2015 मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आणि पुन्हा महाराष्ट्रात वाद पेटला. जितेंद्र आव्हाड यांच्यासह स्वतः शरद पवारांनी पुरंदरेंना पुरस्कार देण्यास विरोध केला. बाबासाहेब पुरंदरेंनी हा पुरस्कार स्वीकारला पण या निमित्ताने महाराष्ट्रात धृवीकरण झाल्याच पाहायला मिळालं. बाबासाहेब पुरंदरेंच काही महिन्यांपूर्वी निधन झाल्यानंतर हा वाद संपेल अशी अपेक्षा होती. परंतु राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका करताना हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आणला आणि दोन्ही बाजूंकडून या बाबतचे दावे-प्रतिदावे पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. 


हे प्रकरण उकरुन काढल्यावर राजकारण तापत असलं तरी समाजमन मात्र गढूळ होत असल्याचं मागील 18-20 वर्षांत स्पष्ट झालं आहे. त्यामुळे जोपर्यंत लोक अशा वादांना प्रतिसाद देणं थांबवणार नाहीत तोपर्यंत याचा राजकीय वापरही थांबवणार नाही. त्यामुळे कोणताही अभिनिवेश न बाळगता शांतपणे अशा वादांना बाजूला सारणं हेच त्यांना शमवण्याचं अस्त्र आहे.