Pune Indrayani River pollution :  पुण्यातील देवाच्या (Alandi) आळंदीतील वारकरी सांप्रदायासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या या इंद्रायणी नदीची (Indrayani River) दयनीय अवस्था झाली आहे. इंद्रायणी नदीतून पाणी नव्हे तर साबणाचा फेसासारखे पाणी वाहताना दिसत आहे. पिंपरी चिंचवडमधील कंपन्या रसायनयुक्त पाणी नदीत सोडतात, त्यामुळं नदी प्रदुषित झाली आहे. या प्रदुषणामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.


आळंदी शहरातून (Alandi News) वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचा उगम लोणवळ्यात (Lonavala) होते. लोणावळ ते आळंदी या मार्गावर पिंपरी-चिंचवडचं (Pimpri-Chinchwad) मोठं औद्योगिक क्षेत्र वसलेलं आहे. यात कंपन्यामुळे या नदीचं फेसाळलेलं रुप तयार झालं आहे. या कंपन्यामधून रसायन युक्त पाणी सोडलं जातं आणि त्याच्यामुळे नदीची अवस्था खराब झाली आहे.


मागील अनेक वर्षांपासून नदीच्या प्रदुषणात सातत्याने वाढ होत आहे. अनेक वर्षांपासून वारकरी आणि गावकऱ्यांनी यासंदर्भात प्रशासनानाला निवेदनं दिली आहेत. मात्र त्यावर कोणीही तोडगा काढला निघाला नाही आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आळंदी दौऱ्यावर असताना गावकऱ्यांनी त्यांच्याकडेदेखील नदीच्या प्रदुषणाचं गाऱ्हाणं मांडलं. मात्र, त्यांनीदेखील यासंदर्भात कोणतीही चौकशी केली नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे. आळंदीत दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. इंद्रायणी नदीच्या पाण्यात स्नान करतात. पाणी तीर्थ म्हणून पितात. या नदीचं पाणी प्रत्येक वारकऱ्यांसाठी तीर्थ आहे, त्यामुळे या नदीकडे शासनाने लक्ष देणं गरजेचं असल्याचंही नागरिकांनी सांगितलं आहे. 


नागरिकांच्या आरोग्याला धोका


लाखो नागरिक स्नान करतात. या नदीत रसायन युक्त पाणी आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची मोठी शक्यता आहे. रसायनामुळे त्वचारोगाच्या समस्यादेखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. शासनाने या नदीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि या प्रदुषणावर तोडगा काढण्याचीही गरज असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. 


नदीकाठची शेती आणि जनावरे धोक्यात


या नदीकाठी अनेक गावं आहेत आणि शेतीदेखील आहे. या प्रदुषित पाण्यामुळे शेतीचं आरेग्य धोक्यात आले आहे. शिवाय शेतीसाठी लागणारे जनावरंदेखील याच नदीतील पाणी पित असल्याने जनावरांच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. चिखली, निघोजे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे पाळील प्राणी या प्रदुषित पाण्यामुळे दगावले आहेत. त्यामुळे नदी प्रदुषित करणाऱ्यांवर नागरिक संतापले आहेत. या नदीत प्रक्रिया न करता पाणी सोडले जाते, त्यामुळे या रसायन युक्त पाणी सोडणाऱ्यां कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.